Dharmendra Birthday : बॉलिवूडचा ‘वीरू’ अर्थात दिग्गज अभिनेते धर्मेन्द्र यांचा आज वाढदिवस. 8 डिसेंबर 1935 रोजी लुधियाना जिल्ह्यातील (पंजाब) नसराली गावात एका जाट कुटुंबात जन्मलेल्या धर्मेन्द्र यांचं खरं नाव धरम सिंह देओल आहे. धर्मेन्द्र यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. अर्थात त्याआधीचा स्ट्रगल सोपा नव्हता.
मायानगरीत अनेक जण स्वप्नं घेऊन येतात. काही यशस्वी होतात तर काहींना निराश होऊन मायानगरीतून परतावं लागतं. धर्मेन्द्र यांच्यासोबतही असंच काही घडलं होतं. हिरो बनण्याचं स्वप्नं घेऊ ते मुंबईत आलेत. पण मुंबई आल्यावर करिअरच्या सुरूवातीला धर्मेन्द्र यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हाती पैसा नाही, सिनेमा नाही, अशा परिस्थितीत त्यांनी अनेक दिवस तग धरला. पण एकेदिवशी धीर सुटला. धर्मेन्द्र खचले आणि त्यांनी पंजाबला परत जाण्याचा निर्णय घेतला. पण याच दरम्यान मनोज कुमार यांची एन्ट्री झाली आणि त्या एन्ट्रीनं धर्मेन्द्र याचं अख्खं आयुष्य बदललं.
धर्मेन्द्र मुंबईत नशीब आजमावत होते,याचदरम्यान त्यांची मनोज कुमार यांच्याशी भेट झाली होती. दोघंही एकाच मार्गावर होते. त्यामुळे लवकरच त्यांच्यात मैत्री झाली. मनोज कुमार यांना लेखनाची कामं मिळत होती, त्यामुळे त्यांना चिंता नव्हती. पण धर्मेन्द्र यांच्याकडे कामचं नव्हते. हिरो बनण्याचं स्वप्नं घेऊन मुंबईत आलेले धर्मेन्द्र एकेदिवशी प्रचंड निराश झालेत आणि त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला.
त्या दिवशी सगळी स्वप्नं मागे सोडून ते पंजाबला जायला निघाले. त्यांनी ट्रेनदेखील पकडली. मनोज कुमार यांना ही गोष्ट कळली आणि त्यांनी लगेच स्टेशन गाठलं. त्यांनी धर्मेन्द्र यांना समजावून घरी परत आणलं आणि तोच क्षण धर्मेन्द्र यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. मनोज कुमार यांनी धर्मेन्द्र यांना धीर दिला. त्यांना पुन्हा संघर्षासाठी तयार केलं. अखेर एक दिवस फळ मिळालंच.
धर्मेन्द्र यांनी 1960 साली अर्जुन हिंगोरानीच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना 51 रुपये मानधन मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. यानंतरचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहेच...