मुंबई: भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. असंख्य गाणी, अनेक आठवणी मागे ठेवून लता दीदींना जगांचा निरोप घेतला. लता दीदींच्या निधनानं दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना धक्का बसला. त्या धक्क्यातून ते अद्यापही सावरलेले नाहीत. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना धर्मेंद्र यांनी लता दीदींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी काही आठवणींनादेखील उजाळा दिला.
शेवटच्या काही वर्षांत लता मंगेशकर एकटेपणापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत होत्या, असं धर्मेंद्र यांनी सांगितलं. 'लता मंगेशकरांसोबत गेल्या ३-४ वर्षांत अनेकदा संवाद झाला. त्या एकटेपणापासून पळण्याचा प्रयत्न करत असल्याचं संवादातून जाणवलं. त्या मला धीर द्यायच्या. एकदा मी ट्विटर खिन्न मनानं काहीतरी लिहिलं. ते वाचून लता दीदींनी मला कॉल केला. जवळपास अर्धा तास त्या बोलल्या. त्यांनी मला हिंमत दिली. आधार दिला,' असं धर्मेंद्र यांनी सांगितलं.
'लता दीदींचं वय जास्त होतं. माझं वयदेखील अधिक आहे. या वयात आल्यावर माणसं काय विचार करतात ते मी समजू शकतो. वय झाल्यावर माणूस जुन्या गोष्टींचा विचार करू लागतो. जुन्या आठवणी डोक्यात येतात. काहीच काम न करता नुसतं बसून राहण्याचं वाईट वाटतं. बरेच लोक ही गोष्ट बोलून दाखवत नाहीत. मात्र त्यामुळे माणूस आतून तुटतो,' असं धर्मेंद्र म्हणाले.
लता दीदींना दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये शेवटचा निरोप देण्यात आला. लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी आपण निघत होतो. तीनदा त्यासाठी तयार झालो. पण मी जाऊ शकलो नाही, असं धर्मेंद्र यांनी सांगितलं. लता दीदींवर मी माझ्या सख्ख्या बहिणीपेक्षा अधिक प्रेम केलं, अशा शब्दांत धर्मेंद्र यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.