प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेला 'धर्मवीर' हा सिनेमा प्रचंड गाजला. २०२२ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित होता. 'धर्मवीर'ला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली होती. 'धर्मवीर' नंतर 'धर्मवीर २'च्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. आता 'धर्मवीर २'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
'धर्मवीर २' सिनेमामधून आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या टीझरच्या सुरुवातीला आनंद दिघे यांना एक बुरखा घातलेली मुस्लीम महिला राखीपौर्णिमेच्या दिवशी ओवाळताना दिसत आहे. आनंद दिघे त्या महिलेला बुरखा काढण्यास सांगतात. महिलेने बुरखा काढताच तिचा चेहऱ्या जखमा दिसत आहेत. ते पाहून आनंद दिघे संतप्त झालेले दिसत आहेत. त्यानंतर त्या महिलेच्या ते थेट घरी जात असल्याचं टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. "समाज कुठलाही असो, किंवा कुठलाही धर्म असो...ज्याच्या घरातील लक्ष्मी दु:खी, त्याची बरबादी नक्की", असं आनंद दिघे म्हणत असल्याचं टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
टीझर पाहून 'धर्मवीर २' सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'धर्मवीर २'च्या टीझरमधून पुन्हा एकदा प्रसाद ओक प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या टीझरमध्ये त्याचा तोच करारी बाणा आणि भेदक नजर अनुभवायला मिळत आहे. 'धर्मवीर २'च्या टीझरमध्ये प्रसाद ओकसह अभिनेत्री स्नेहल तरडेदेखील दिसत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रवीण तरडेंनी केलं आहे. तर मंगेश देसाईंनी सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा ९ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.