‘धोंडी’ आज प्रेक्षकांच्या भेटीला
By Admin | Published: June 9, 2017 02:28 AM2017-06-09T02:28:02+5:302017-06-09T02:28:02+5:30
‘टोपीवर टोपी,’ ‘चिकट नवरा,’ ‘एक होता विदूषक,’ ‘विश्वविनायक’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
अवघ्या १६व्या वर्षी ‘सर्जा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री पूजा पवार यांनी ‘टोपीवर टोपी,’ ‘चिकट नवरा,’ ‘एक होता विदूषक,’ ‘विश्वविनायक’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘सर्जा’ या चित्रपटात त्यांची नायिकेची भूमिका होती आणि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. झपाटलेला, माझा छकुला, चिकट नवरा या चित्रपटांतही त्यांनी नायिकेचे काम केले होते आणि हे तिन्ही चित्रपट हिट झाले होते. पूजा यांच्या ‘धोंडी’ या आगामी चित्रपटाविषयी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मराठी चित्रपटातील त्यांच्या कमबॅकविषयीचे मनोगत व्यक्त केले. त्या सांगतात, ‘पूर्वीचे चित्रपट कथा-कादंबरीवर आधारित असत. आता वास्तववादी चित्रपटांची निर्मिती होत आहे. एकंदरीतच मराठी चित्रपटसृष्टीला आता चांगले दिवस आले आहेत. २० वर्षांनी परत एकदा चित्रपटांमध्ये काम करण्याचा माझा अनुभव खूप चांगला होता.’ मुलाखतीदरम्यान ‘धोंडी’ या चित्रपटाच्या कथेविषयी त्यांनी माहिती दिली. हा चित्रपट एका शेतकरी कुटुंबावर आणि शेतकऱ्यांच्या सद्य:स्थितीवर आधारित आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी समाज आणि शेतकरी या दोघांनाही एक सकारात्मक विचार देणारा हा चित्रपट आहे. तसेच हा सामाजिक जबाबदारीचे भान जागवणारा चित्रपट आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे हे शेतकऱ्याच्या भूमिकेत असून पूजा पवार यांनी शेतकऱ्याच्या सहचारिणीची भूमिका निभावली आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना पूजा पवार सांगतात, ‘माझी भूमिका कुटुंबाला सांभाळणाऱ्या एका साध्या पण खंबीर स्त्रीची आहे. नवऱ्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करणाऱ्या मुलाला आधार देणारी आई मी या चित्रपटात साकारली आहे.’ ‘शेतकरी आत्महत्या’ या ज्वलंत विषयावर प्रत्येकाने विचार करायला हवा. शेतकऱ्याला जगवणे ही प्रत्येकाचीच सामाजिक जबाबदारी आहे. शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर हा चित्रपट निश्चितच एक विचार देणारा ठरेल. ‘धोंडी’ कौटुंबिक चित्रपट असून प्रत्येकाने आवर्जून चित्रपटगृहात जाऊन पाहावा, असे आवाहन पूजा पवार यांनी केले. सॉईल इव्हेंट्स अँड एंटरटेन्मेंट निर्मित ‘धोंडी’ आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.