सूरज बडजात्या (Sooraj R. Barjatya) यांनी हिंदी सिनेसृष्टीला तीन ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. मैंने प्यार किया, हम आपके है कौन आणि हम साथ साथ है. या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पण ‘हम आपके है कौन’ (Hum Aapke Hain Koun) या सिनेमाने त्याकाळात सर्वांनाच वेड लावलं होतं. या सिनेमात मुख्य भूमिका सलमान खान आणि माधुरी दीक्षितने साकारली होती. याशिवाय या चित्रपटात अनुपम खेर, रीमा लागू, मोहनीश बहल, रेणुका शहाणे, आलोक नाथ यांच्यासह अनेक स्टार्स होते. या मल्टीस्टारर चित्रपटाशी संबंधीत अनेक किस्से आहेत, जे चाहत्यांना जाणून घेण्याची आजही इच्छा आहे. यापैकी एका किस्सा आहे माधुरी दीक्षितच्या मानधना संदर्भात.
दरम्यान अनुपम खेर यांनी त्यांच्या चॅट शोमध्ये माधुरीला या चित्रपटात काम करण्यासाठी तिला सलमानपेक्षा जास्त मानधन मिळाले आहेत का, असा प्रश्न विचारला होता. Reddit वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनुपम खेर माधुरीला विचारत आहे- "मी असं ऐकले आहे की, तुला हम आपके है कौन मध्ये सलमान खानपेक्षा जास्त पैसे मिळाले होते?" हे ऐकून माधुरी हसली. अनुपम खेर यांच्या प्रश्नाला ती थेट उत्तर देत नाही आणि म्हणते- "ही चर्चा सुरू झाली असेल, तर सुरु राहू द्या."
रिपोर्ट्सनुसार, माधुरीने या सिनेमासाठी सगळ्या कलाकारांपेक्षा जास्त मानधन घेतलं होतं. तिने या सिनेमासाठी त्यावेळी 2.7 कोटी रूपये मानधन घेतलं होतं. ही त्यावेळी एका अभिनेत्रीला मिळालेलं सगळ्यात जास्त मानधन होतं.
विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा सूरज बडजात्या यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. या चित्रपटात एकूण 13 गाणी होती. हा 1994 सालचा सर्वात हिट चित्रपट होता. या चित्रपटासाठी माधुरीला 1995 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार आणि सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटाच्या रिलीजला नुकतीच २९ वर्षे पूर्ण झाली आहेत.