ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - अक्षय कुमारच्या आगामी 'गोल्ड' सिनेमामधून निम्रत कौर बाहेर पडली आहे. एका कार्यक्रमा दरम्यान स्वत: निम्रतने आपण हा सिनेमा करत नसल्याची माहिती दिली. 'गोल्ड' सिनेमाचे कथानक स्वातंत्र्यानंतर भारताला मिळालेल्या पहिल्या ऑलिंम्पिक पदकावर आधारीत आहे.
रीमा कागती या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, २०१८ च्या स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नामुळे निम्रत 'गोल्ड' सिनेमामधून बाहेर पडल्याची चर्चा आहे. वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या 'एअरलिफ्ट' चित्रपटात निम्रतने अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
पती-पत्नी म्हणून अक्षय आणि निम्रतची जोडी तसेच त्यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. तिकीट खिडकीवरही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. पण याच चित्रपटा दरम्यान निम्रत आणि अक्षयची जवळीक वाढल्याच्याही बातम्याही आल्या होत्या. हीच गोष्ट ट्विंकलला खटकल्यामुळे कदाचित निम्रतने हा चित्रपट सोडला असावा अशी चर्चा आहे.