'सैराट' सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली. सध्या रिंकूच्या दुसऱ्या सिनेमाची प्रतीक्षा असली तरी ती कायमच 'आर्ची' म्हणून रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवेल. मूळची अकलूजची असलेल्या रिंकूनं आपल्या अभिनयाने साऱ्यांनाच तोंडात बोटं घालायला लावली आहेत. असं असलं तरी आर्चीची एक अशी गोष्ट आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. रिंकुची प्रमुख भूमिका असलेल्या 'कागर' या चित्रपटाविषयी तिच्या फॅन्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, आता फॅन्सना हा चित्रपट पाहण्यासाठी अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे. कारण रिंकुची बारावीची परीक्षा असल्याने व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर कागर प्रदर्शित होणार नाही.
सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे. वडील-मुलाच्या नात्यावर आधारित रिंगण आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला 'यंग्राड' हे दोन चित्रपट मकरंदनं या पूर्वी दिग्दर्शित केले होते. 'रिंगण' आणि 'यंग्राड' हे दोन्ही चित्रपट भिन्न पद्धतीचे होते.
दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर रिंकुचा चित्रपट येत असल्याने कागरविषयी प्रचंड उत्सुकता आणि चर्चा आहे. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने कागर प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, फेब्रुवारीमध्येच रिंकुची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे, असं निर्माते विकास हांडे आणि सुधार कोलते यांनी स्पष्ट केलं.
मला स्वतःला कागर विषयी प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने फॅन्सना पुन्हा भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार होती. मात्र, बारावीची परीक्षा असल्याने मला अभ्यासाला वेळ देणे आवश्यक आहे हे निर्मात्यांनी लक्षात घेतलं आणि १४ फेब्रुवारीला माझ्यासाठी चित्रपट प्रदर्शित करायचा नाही असं ठरवलं. त्यासाठी मला त्यांचे आभार मानावेसे वाटतात. पण आता चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असलं, तरी लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल,' असं रिंकुनं सांगितलं आहे.