‘बालिकावधू’ या मालिकेतील दादी सा अर्थात सुरेखा सीकरी ( Surekha Sikri) आज आपल्यात नाहीत. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सुरेखा यांनी ग्लॅमर नाही तर प्रतिभेच्या जोरावर इंडस्ट्री गाजवली. 10 वर्ष रंगभूमीची सेवा केल्यानंतर सुरेखा यांनी 1978 साली ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या सुरेखा सीकरी यांचे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत अगदी जवळचे नाते असल्याचे तुम्हाला माहीत आहे का? सुरेखा या नसीर यांच्या नात्याने मेहुणी होत्या.
वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी आपल्या वयापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या मनारा सीकरीसोबत लग्न केले होते. मनारा ही सुरेखा सीकरी यांची सावत्र बहिण होती.त्यांच्या पत्नी मनारा यांना परवीना मुराद या नावानेही ओळखले जाते. नसीर यांनी मनारासोबत लग्न करण्याची इच्छा घरातल्यांना सांगितली होती. त्यावेळी त्यांच्या घरातल्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता.
घरातल्यांचा विरोध असतानाही नसीर यांनी मनारासोबत लग्न केले. लग्नानंतर वर्षभरातच मनारा यांनी एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव नसीर यांनी हीबा शाह असे ठेवले. त्यानंतर वर्षभरातच नसीर आणि मनारा यांच्यात खटके उडायला लागले. 1982 मध्ये नसीर आणि मनारा यांच्यात घटस्फोट झाला. नसीर व मनारा यांची मुलगी हीबा ही सुरेखा यांची भाची. हीबाने ‘बालिका वधू’मध्ये दादीसाच्या तरूणपणीची भूमिका साकारली होती.सुरेखा यांनी हेमंत रेगेसोबत लग्न केले होते. 12 वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. दोघांना एक मुलगा आहे. सुरेखा सीकरी यांचा मुलगा राहुल मुंबईत राहतो आणि अभिनेता आहे.