बॉलिवूडमध्ये नशीब कशी कलाटणी घेईल, हे सांगता यायचे नाही. एका चित्रपटाने एखादा सुपरस्टार होतो तर एका चित्रपटाने ‘फ्लॉप’चा शिक्का माथ्यावर बसतो. एखादा अभिनेता एखादा सिनेमा नाकारतो आणि तोच सिनेमा करून दुसरा स्टार बनतो. अभिनेता अनिल कपूरसोबतही असेच काही घडले. होय, अमिताभ बच्चन यांनी एक चूक केली आणि त्यांच्या या चुकीचा फायदा मिळाला तो अनिल कपूर यांना. कसा तर पुढे वाचा.
ही गोष्ट आहे 1987 सालची. होय, सलीम-जावेद ही बॉलिवूडची बेस्ट जोडी ‘मिस्टर इंडिया’ची पटकथा लिहिती होती. बोनी कपूर या चित्रपटाचे निर्माते होते आणि दिग्दर्शनाची जबाबदारी शेखर कपूर यांच्या खांद्यावर होती. ‘मिस्टर इंडिया’साठी शेखर कपूर व बोनी कपूर यांच्या डोक्यात एकच नाव होते, ते म्हणजे अमिताभ बच्चन यांचे. होय, चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्यापूर्वीच या चित्रपटासाठी अमिताभ यांचे नाव फायनल झाले होते. अगदी अमिताभ यांना डोळ्यापुढे ठेवून स्क्रिप्ट लिहा, असे शेखर कपूर व बोनी कपूर यांनी सलीम-जावेद यांना सांगितले होते. सलीम-जावेद यांनी सांगितल्यानुसार, अमिताभ बच्चन यांना डोळ्यापुढे ठेवून ‘मिस्टर इंडिया’ची स्क्रिप्ट लिहिली. स्क्रिप्ट पूर्ण झाली आणि मेकर्स ही स्क्रिप्ट घेऊन अमिताभ यांच्याकडे गेलेत. अमिताभ यांचा होकार मिळेल, अशी सगळ्यांनाच खात्री होती. पण झाले उलटेच. अमिताभ यांनी ‘मिस्टर इंडिया’ करण्यास नकार दिला. या नकाराचे कारण काय, तर चित्रपटात अनेक दृश्यांत ते अदृश्य राहणार होते. त्यांचा आवाज तेवढाच ऐकू येणार होता. अमिताभ यांना हे मान्य नव्हते. अखेर त्यांनी चित्रपटास नकार दिला.
असे म्हणतात की, अमिताभ यांनी नकार दिल्यावर राजेश खन्ना यांना हा चित्रपट ऑफर केला गेला. पण त्यांनीही हेच कारण समोर करत चित्रपट करण्यास नकार दिला. अमिताभ व राजेश खन्ना यांचा नकार कुणालाच अपेक्षित नव्हता. बोनी कपूर यांना या नकाराबद्दल कळले तेव्हा काही क्षण तेही भांबावले. यावरचा तोडगा काय, तर सरतेशेवटी आपल्या भावालाच घेऊन हा सिनेमा बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बोनी कपूर यांचा भाऊ कोण तर अनिल कपूर.
शूटींग झाले आणि ठरलेल्या तारखेला ‘मिस्टर इंडिया’ रिलीज झाला. विशेष म्हणजे ब्लॉकबस्टर ठरला. ‘मिस्टर इंडिया’ ब्लॉकबस्टर झाल्यानंतर अनिल कपूर मोठ्या कलाकारांच्या रांगेत येऊन बसला. कारण या चित्रपटाच्या अगोदर अनिल कपूरचे मेरी जंग आणि कर्मा हे फक्त दोनच चित्रपट हिट झाले होते. ‘मिस्टर इंडिया’ने अनिल कपूरला एक वेगळी ओळख दिली. एकंदर काय तर अमिताभ यांच्या एका चुकीमुळे बॉलिवूडला अनिल कपूरच्या रुपात एका मोठा सुपरस्टार मिळाला.