गेल्या बुधवारी रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण दुसऱ्याच दिवशी रुग्णालयातच त्यांनी अंतिम श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
ऋषी कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. त्यांच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यांच्या हिना या चित्रपटाची केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्ये देखील चर्चा रंगली होती. या चित्रपटात ऋषी कपूर नायकाच्या तर झेबा बख्तियार नायिकेच्या भूमिकेत दिसली होती पण या चित्रपटात करिश्मा कपूरला काम करण्याची इच्छा होती.
हिना या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कपूर करणार होते. राज कपूर यांच्या निधनामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा मुलगा रणधीर कपूर यांनी केले. या चित्रपटात करिश्मा कपूरला नायिकेची भूमिका साकारण्याची इच्छा होती. पण या चित्रपटात तिचे काका ऋषी कपूर नायकाच्या भूमिकेत असल्याने तिचा हा विचार बदलला. तिनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते.
करिश्माने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला हिना या चित्रपटात काम करायचे होते. पण आजोबांनी (राज कपूर) चिंटू काकाला (ऋषी कपूर) चित्रपटात नायक म्हणून घेतले होते. त्यामुळेच मी या चित्रपटाचा हिस्सा बनली नाही.
काका-पुतणी नायक-नायिका म्हणून काम करणे योग्य ठरणार नाही आणि प्रेक्षक ही गोष्ट स्वीकारणार देखील नाहीत याची कल्पना करिश्माला असल्यामुळेच तिने हिना या चित्रपटात काम करण्याचा विचार बदलला होता. त्या्नंतर काही वर्षांनी प्रेम कैदी या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमधील तिच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली.