आपल्या उत्कृष्ट अभिनयाने, आवाजाने आणि आपल्या सौंदर्याने वर्षानुवर्षे चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री राणी मुखर्जी 21 मार्च रोजी आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. राणीने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. तिनं बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण राणीच्या जन्माचा किस्सा जाणून घेणार आहोत.
'कुछ कुछ होता है' सारख्या चित्रपटातून आपला ठसा उमटवणाऱ्या राणी मुखर्जीच्या जन्माचा मजेशीर किस्सा स्वतः तिनं सांगितला होता. काही वर्षांपूर्वी राणीने सिमी गरेवालला मुलाखत दिली होती. यावेळी तिनं सांगितलं होतं की, 'माझ्या जन्माच्या दरम्यान एका पंजाबी कुटुंबातील मुलीसोबत माझी अदलाबदली झाली होती. विशेष म्हणजे माझ्या आईला तिच्याकडे असलेली मुलगी ही तिची मुलगी नाही, हे त्याचवेळी समजलं. माझ्या आईनं जेव्हा त्या मुलीला पाहिलं, तेव्हा ती डॉक्टरांना म्हणाली ही माझी मुलगीच नाही, हिचे डोळे तपकिरी नाहीत. तुम्ही आताच्या आता जा आणि माझ्या मुलीला शोधून आणा. त्यानंतर मला शोधण्यात आलं'.
अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीने 1996 मध्ये 'बियेर फूल' या चित्रपटाद्वारे सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात अभिनेत्रीची मुख्य भूमिका नव्हती, ती या चित्रपटात मिली चॅटर्जीच्या सहाय्यक भूमिकेत दिसली होती. मात्र, त्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटात राणी मुखर्जीला मुख्य अभिनेत्री म्हणून तिचं अभिनय कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. यानंतर आमिर खानच्या "गुलाम' या चित्रपटातून राणीला विशेष ओळख मिळाली.
राणी मुखर्जीने आपल्या 28 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या काळात राणीने 'कुछ कुछ होता है', 'हर दिल जो प्यार करेगा', 'नायक', 'मुझसे दोस्ती करोगी', 'साथिया', 'वीर-झाराट, 'हम तुम', 'मर्दानी' आणि 'हिचकी' अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अप्रतिम अभिनयाने सर्वांची मने जिंकली. गेल्या वर्षी राणी 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटात दिसली होती आणि हा चित्रपट यशस्वी ठरला.राणीनं दिग्गज हिंदी चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मोठा मुलगा आदित्य चोप्राशी लग्न केलं आहे. त्यांना एक मुलगीही आहे, तिचे नाव अधीरा असं आहे.