नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात अभिनेता भरत जाधवने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर छाप उमटविली आहे. आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याने अनेक हिंदी चित्रपटात देखील भूमिका साकारल्या आहेत. भरत हा अतिशय सामान्य कुटुंबातील असून त्याचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. लालबाग परळमधील एका चाळीत त्याचे बालपण गेले आहे. त्याची पत्नी सरीता जाधव यांच्याबद्दल फार कमी जणांना माहित आहे. ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.
अभिनेता भरत जाधवच्या पत्नीचे नाव सरिता जाधव असून त्यांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव आहे सुरभी तर मुलाचे नाव आहे आरंभ. भरत जाधव आणि सरिता यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा त्यांनी अशी ही आशिकी या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सांगितला होता.
सरीताने सांगितले होते की, भरतचा तिच्या ऑफिसमध्ये फोन आला होता. ते दोघे पहिल्यांदा भेटणार होते. लवकर निघण्यासाठी ती वरिष्ठांची परवानगी मागायला गेली होती तर येशील ना उद्या... असे विचारत तिची टर उडवली होती. त्या दोघांनी पहिल्यांदा खिलाडी हा चित्रपट एकत्र पाहिला होता. हा चित्रपट पाहण्यात नव्हे तर फक्त तिच्यासोबत गप्पा मारण्यात आणि वेळ घालवण्यात भरतला रस होता, अशी त्याने कबुली दिली होती.
भरत जाधवने शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारापासून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याची ऑल द बेस्ट ही एकांकिका खूप गाजली. यावर आधारित असलेल्या ऑल द बेस्ट या नाटकाला लोकांनी डोक्यावर घेतले.
त्यानंतर श्रीमंत दामोदर पंत, अधांतर, सही रे सही यांसारखी अनेक सुपरहिट नाटक त्याने रंगभूमीला दिली.
याशिवाय भरत जाधवचे मुक्काम पोस्ट लंडन, खतरनाक, गलगले निघाले, जत्रा आणि नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे असे बरेच चित्रपटही खूप हिट ठरले.