प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा 'गॅटमॅट' राहून जातो. लव्हस्टोरी सुरु होण्याआधी दोघांपैकी एकाला प्रेमाची कबुली ही द्यावीच लागते. पण ती किंवा तो काय विचार करेल या न्यूनगंडात सर्वच काही राहून जातं. अश्या या अव्यक्त भावनांचे मिलन करून देणारी 'गॅटमॅट' ही संस्था येत्या १६ नोव्हेंबरपासून गरजवंतांच्या सेवेला हजर राहणार आहे. मोठ्या पडद्यावर सादर होत असलेल्या या 'गॅटमॅट'चे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आले. अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज निर्मित 'गॅटमॅट' या सिनेमाचे हे टीझर तरुणवर्गासाठी पर्वणी ठरत आहे.
निशीथ श्रीवास्तव यांच्या दिग्दर्शनाखाली प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाच्या टीझरमधून कॉलेजविश्वातील रंगीत दुनिया आपल्याला पाहायला मिळते. तरुणाईने बहरलेल्या या टीझरमध्ये 'गॅटमॅट' चे संस्थापक रंग्या आणि बगळ्या आपल्याला दिसून येतात. गावावरून आलेली ही सामान्य मुलं कशा पद्धतीनं कॉलेजकट्ट्यावर 'गॅटमॅट' चा फड रंगवतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये अक्षय टंकसाळे बरोबर रसिका सुनील आणि निखील वैरागर बरोबर पूर्णिमा डे अशी जोडीदेखील आपल्याला पाहायला मिळते. मैत्री, प्रेम आणि रोमान्स दाखवणारे 'गॅटमॅट' सिनेमाचे हे टीझर तरुणवर्गाला लुभावणारे ठरत आहे. राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून, महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांसाठी हा 'गॅटमॅट' मनोरंजनाची खुमासदार मेजवानी घेऊन येत आहे.
विशेष म्हणजे या सिनेमात सा-यांची लाडकी अभिनेत्री माझ्या नव-याची फेम शनाया अर्थात रसिका सुनिल झळकणार आहे. तिची भूमिक सिनेमात कशी असणार याविषयी अधिक माहिती समोर आली नसली तरीही तिला रूपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मात्र तिच्या चाहत्यांना या सिनेमाच्या माध्यमातून मिळणार आहे.
शनायाने मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारली असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण होते. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली होती. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना भावला होता. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील रसिकांना शनाया पसंतीस पात्र ठरली.
रसिकाने 'माझ्या नव-याची बायको' मालिकेला अलविदा केल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या मनात दडलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणारी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, मालिकेला मिळणा-या ''टीआरपीचे आकडे बदलत राहतील मात्र रसिकांचे मिळणारे प्रेम असेच राहु द्या''. शनाया फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी न्युयॉर्कला गेली असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी तिने चाहत्यांसह संवाद साधत रहावा असेही चाहते तिला सुचवत आहेत.