ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18- अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या दमदार अभिनयामुळे चांगलाच चर्चेत असतो. सिनेमातील त्याच्या भूमिकांचं कौतुकही तितकंच होतं. पण बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा नवाजचा प्रवास सोपा नव्हता. बरंच स्ट्रगल त्याला करावं लागलं होतं. याआधी नवाजला त्याच्या रंगरूपामुळे बऱ्याचदा सिनेमातील प्रमुख भूमिकांसाठी नाकारलं गेलं होतं. भुतकाळातील अशाच काही घटनांना आठवत नवाजने एक ट्विट केलं आहे. त्यावरून बॉलिवूडमध्ये वर्णभेद असल्याचे संकेत नवाजने दिले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नवाजने हे ट्विट नेमकं का आणि कोणासाठी केलं? याबद्दलची चर्चा सध्या सिनेवर्तुळात सुरू झाली आहे.
"मी कुठल्याही गोऱ्या आणि हॅण्डसम व्यक्तीबरोबर काम करू शकत नाही कारण मी डार्क आहे. याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. मी दिसायला चांगला नाही, पण मी कधीही या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं नाही," असं ट्विट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने केलं आहे. नवाजुद्दीनचं हे ट्विट नेमका कोणाला इशारा आहे, याबद्दल नवाजने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. पण नवाजचं वर्णभेदावरचं हे ट्विट गोरा रंग नसल्याने त्याला सिनेमात न घेणाऱ्या प्रत्येक निर्माते-दिग्दर्शकांसाठी असल्याचं बोललं जातं आहे. याआधी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नवाजने त्याच्या वर्णावरून कामं मिळविण्यासाठी कराव्या लागलेल्या स्ट्रगलबद्दल सांगितलं होतं. स्मॉल स्क्रीनवर भूमिका मिळविण्याचा प्रवास किती कठीण होता, हेसुद्धा नवाजने सांगितलं होतं.
आणखी वाचा
जग्गा जासूसच्या निर्मात्याला होणार 40 कोटींचा तोटा
राजेश खन्ना उर्फ जतीन अरोडा यांचा स्मृतिदिन
"मी आउटसायडर असल्याने बॉलिवूडमध्ये जम बसवणं कठीण होतं. मी अभिनेत्या सारखा दिसत नाही, म्हणून बऱ्याचदा मला भूमिकेसाठी नकार देण्यात आला होता. माझ्याकडे सिक्स पॅक अॅब्स, उत्तम उंची आणि अभिनेत्यासारखा चार्म नसल्याने मला अनेकांनी नाकारलं होतं. माझ्यातील अभिनय कौशल्य न बघता माझ्या रंग-रूपावरून लोक माझ्याबद्दलची मतं बनवत गेली", असं नवाजने मुलाखतीत म्हंटलं होतं. पण या सगळ्या गोष्टी असूनही नवाजने बॉलिवूडमध्ये त्याचं वेगळं स्थान निर्माण केलं तसंच लोकांची मनंही तो जिंकतो आहे.
नुकतंच "मॉम" या सिनेमातून नवाज एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर आला. तसंच "जग्गा जासूस" या सिनेमातही त्याची भूमिका आहे. यापुढे अभिनेता टायगर श्रॉफसह मुन्ना मायकल आणि बाबूमोशय बंदूकबाज या दोन सिनेमातून नवाज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.