हाऊसफुल्ल! ‘पावनखिंड’ने बॉक्स ऑफिसवरही फडकवला झेंडा, तीन दिवसांत कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 12:35 PM2022-02-23T12:35:03+5:302022-02-23T12:38:59+5:30
Pawankhind Box Office Collection : नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’नंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘पावनखिंड’ हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे.
Pawankhind Box Office Collection : शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ (Pawankhind) या मराठी चित्रपटाने (Marathi Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं चित्र आहे. अनेक चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागला आहे. पहिल्याच दिवशी 1530 शोजसह ‘पावनखिंड’ चित्रपटगहात दाखल झाला. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाला 1910 शो मिळाले. याचा परिणाम म्हणजे अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे.
‘सैराट’नंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गेल्या शुक्रवारी सिनेमाने 1.15 कोटींचा गल्ला जमवला. शनिवारी या चित्रपटाने 2.05 कोटींची कमाई केली आणि रविवारी तिसऱ्या दिवशी कमाईचा आकडा 3 कोटींवर पोहोचला. चित्रपटाने ओपनिंग विकेंडमध्ये एकूण 6 कोटींचा बिझनेस केला आहे. विशेष म्हणजे, नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’नंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘पावनखिंड’ हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे.
2016 साली नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच विकेंडमध्ये 11.5 कोटींचा पल्ला गाठला होता. ‘पावनखिंड’ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना नियमामुळे 50 टक्के क्षमतेनेच चित्रपटगृह सुरू असली तरी अवघ्या तीन दिवसातच ‘पावनखिंड’ने 6.03 कोटींचा बिझनेस केला आहे.
‘गंगुबाई काठियावाडी’ देणार तगडी टक्कर
‘पावनखिंड’ चित्रपट बनवण्यासाठी जवळपास 8 कोटींचा खर्च लागला असल्याचे सांगितले जाते. यात चित्रपटाचे प्रमोशन आणि पोस्टर्सचा खर्च समाविष्ट आहे. तीन दिवसात 6 कोटींचा गल्ला जमवणारा ‘पावनखिंड’चे पुढील दिवसांचे बुकिंग झाल्यामुळे हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहे. अशात या आठवड्यात आलिया भटचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा हिंदी सिनेमा प्रदर्शित होतोय. ‘पावनखिंड’ आलियाच्या या चित्रपटाला कशी टक्कर देतो, ते पाहणंही इंटरेस्टिंग असणार आहे.
18 फेबु्रवारीला दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित पावनखिंड हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अत्यंत चोख बजावली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी जिजाऊंची भूमिका तितक्याच ताकदीनं उभी केली आहे. बाजीप्रभूंची मध्यवर्ती भूमिका अजय पुरकर यांनी त्यांच्या खांद्यावर यशस्वी पेललेली दिसतेय. प्राजक्ता माळी, क्षिती जोग, माधवी निमकर, समीर धर्माधिकारी, उज्वला जोग, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, अंकित मोहन यांनी देखील या चित्रपटात जीव ओतला आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन आणि कलाकारांनी साकारलेला दमदार अभिनय यामुळे ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.