बहुचर्चित 'सुभेदार' हा ऐतिहासिक मराठी सिनेमा ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला. नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची असीम गाथा आणि सिंहगडाच्या लढाईचा थरार प्रेक्षकांना या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर दाखविण्यात आला आहे. हा सिनेमा रिलीज होऊन पाच आठवडे झाले तरीही प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. या दरम्यान सिनेमाविषयी आणखी एका माहिती समोर येते आहे.
तान्हाजी मालुसरेंनी कोंढाणा जिंकून तो स्वराज्यात सामील केला होता. हा गड राखण्यासाठी ते धारातीर्थी पडले होते. त्यांच्या या बलिदानानंतर कोंढाणाचे नाव बदलून सिंहगड असे करण्यात आले होते. सिंहगडाच्या लढाईची गोष्ट सांगणाऱ्या 'सुभेदार' चित्रपटानेही बॉक्स ऑफिसचा गड राखला आहे. हिंदी सिनेमांच्या गर्दीतही 'सुभेदार' चांगली कमाई केली आहे.
रुपेरी पडदा गाजवल्यानंतर दिग्पाल लांजेकरचा सुभेदार ओटीटी प्लॉटफॉर्म गाजवणार आहे. गेले अनेक दिवसांपासून चाहते या सिनेमाची ओटीटीवर रिलीज होण्याची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. ‘प्राइम व्हिडीओ’ या OTT प्लॅटफॉर्मवर ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून २२ सप्टेंबर पासून वेगवेगळ्या देशांमध्ये प्रसारित केला जात आहे.
दरम्यान दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' चित्रपटात अभिनेता अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. तर चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णींनी राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.