मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे. हा सगळा इतिहास केवळ पुस्तकरूपात न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे हे आपले कर्तव्य आहे. ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक ठेवा यशस्वीपणे पोहचविल्यांतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटातून आणखी एका अजोड पराक्रमाची गाथा जून २०२० मध्ये मराठी रुपेरी पडद्यावर साकारणार आहेत.
बाजीप्रभू देशपांडे हे शब्द म्हणजे निस्पृह स्वामीनिष्ठा आणि अजोड पराक्रमाचे प्रतिक..! पन्हाळगडाला सिद्दी जोहरने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करुन घेऊन विशालगडाकडे कूच केली. पाठलागावर असलेल्या विजापूरी सैन्याचा धोका लक्षात घेत बाजींनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे ठाकले. हजारोच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी आणि ३०० बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली. अविस्मरणीय पराक्रमाचा हा अध्याय ‘जंगजौहर’ या ऐतिहासिकपटातून लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. छत्रपतींना वाचवताना बांदल सेना व बाजीप्रभू पन्हाळगडाच्या थरारात धारातीर्थ झाले आणि घोडखिंडीतला हा लढा बाजीप्रभू यांच्या स्वराज्यनिष्ठेच्या पवित्र रक्ताने ‘पावन’ झाला.
अनेक ऐतिहासिक मूळ कागदपत्रे व ऐतिहासिक ग्रंथाच्या संशोधनातून हा चित्रपट साकारला जाणार आहे. या चित्रपटाच्या संशोधनासाठी वेगवेगळ्या तत्कालीन घराण्यांच्या वंशजाकडून अधिकृत कागदपत्रांची मदत झाली आहे. ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या प्रारंभी ‘जंगजौहर’ ची पहिली झलक दिसल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता ‘आलमंड्स क्रिएशन्स’चे अजय-अनिरुद्ध आरेकर यांनी ‘जंगजौहर’ चित्रपटाच्या निर्मितीची अधिकृत घोषणा केली आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अतुलनीय पराक्रमाची ‘जंगजौहर’ मधून उलगडणारी बलिदानगाथा प्रत्येकासाठी स्फूर्तीदायक असेल.