11 डिसेंबर 1922 याच तारखेला एका महान अभिनेत्याचा जन्म झाला होता. हा अभिनेता कोण तर बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार. या महान अभिनेत्याचे आयुष्य कोणत्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. दिलीप कुमार व सायरा बानो यांची पे्रमकहाणी तुम्हाला ठाऊक आहे. दिलीप कुमार व मधुबाला यांची अधुरी प्रेमकहाणीही तुम्ही ऐकली असेल. पण दिलीप कुमार यांच्या पहिल्या प्रेमाबद्दल तुम्हाला ठाऊक आहे? होय, 40 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री कामिनी कौशल हे दिलीप कुमार यांचे पहिले प्रेम होते. 1948 साली रिलीज झालेल्या ‘शहीद’ या सिनेमाच्या सेटवर दिलीप कुमार व कामिनी एकमेकांंच्या प्रेमात पडले होते.
रिपोर्टनुसार, कामिनी दिलीप यांच्या प्रेमात पडल्या ख-या पण त्या विवाहित होत्या. कामिनी यांनी आपल्याच मोठ्या बहिणीच्या पतीसोबत लग्न केले होते. कामिनी यांच्या मोठ्या बहिणीचे एका अपघातात निधन झाले होते. तिला एक मुलगा होता. या मुलासाठी आणि कुटुंबाच्या दबावापोटी कामिनी यांनी बहिणीचे पती बी.एस. सूद यांच्यासोबत लग्न केले होते.
विवाहित असूनही कामिनी दिलीप कुमार यांच्यात गुंतल्या. या प्रेमाची खबर कामिनी यांच्या घरी लागली, तेव्हा कुटुंबीयांनी तीव्र विरोध केला. कामिनींच्या भावाने तर दिलीप कुमार यांना चक्क धमकीही दिली होती. कामिनी यांना खरे तर दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न करायचे होते. पण कुटुंबाच्या विरोधात जाण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती.
आम्ही दोघेही उद्धवस्त झालो होतो...
2014 साली ग्लॅमर मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत खुद्द कामिनी दिलीप कुमार यांच्यासोबतच्या या लव्हस्टोरीबद्दल बोलल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या, माझ्यापासून वेगळे झाल्यानंतर मी उद्धवस्त झालो होतो, असे दिलीप कुमार यांनी आपल्या बायोग्राफीत म्हटले आहे. पण खरे सांगायचे तर आम्ही दोघेही उद्धवस्त झालो होतो. आम्ही एकमेकांसोबत खूप आनंदी होतो. पण म्हणून मी पतीचा विश्वासघात करू शकत नव्हते. मी माझ्या दिवंगत बहिणीला काय तोंड दाखवले असते. माझे पती खूप चांगले व्यक्ति आहेत. प्रेमात कोणीही पडू शकते, हे ते जाणतात. त्यांनी मला समजून घेतले.कामिनी यांच्यानंतर दिलीप यांच्या आयुष्यात मधुबाला, वैजंयती माला, सायरा बानो व आसमा रहमान आल्यात. आसमा दिलीप यांची दुसरी पत्नी होती. मात्र लग्नानंतर दोनच वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर दिलीप कुमार पुन्हा सायरा बानो यांच्याकडे परतले होते.