बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी सकाळी मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताज्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांना बायलेटलर फ्ल्यूरल इफ्यूजनमुळे (Dilip Kumar Bilateral Pleural Effusion) आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तथापि त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Dilip Kumar in ICU)कार्डियोलॉजिस्ट डॉ. नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.एनएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. डॉ. जलील पारकर यांनी ई-टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, सर्व काही ठीक राहिले तर दिलीप कुमार यांना येत्या 2-3 दिवसांत रूग्णालयातून सुट्टी मिळेल.
98 वर्षांच्या दिलीप कुमार यांना गेल्या महिन्यातही याच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अर्थात रूटिन चेकअपसाठी दिलीप कुमार यांना भरती करण्यात आल्याचे सायरा बानो यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. कोरोना संक्रमणामुळे गेल्या वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे निधन झाले. गतवर्षी 21 ऑगस्टला त्यांचा लहान भाऊ असलम यांचे निधन झाले होते. ते 88 वर्षांचे होते. यानंतर 2 सप्टेंबरला आणखी एक भाऊ अहसान यांनी जगाचा निरोप घेतला होता. ते 90 वर्षांचे होते.
त्यांच्यासाठी प्रार्थना कर...काल सायरा बानो यांनी पती दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. हे रुग्णालय नॉन कोविड आहे आणि त्यांना करोना झालेला नाही. आम्ही लवकरच घरी परत जाऊ. डॉ. नितीन गोखले आणि त्यांची संपूर्ण टीम दिलीप साहब यांची काळजी घेत आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही दोघांनीही करोना लस घेतली आहे, असे त्यांनी सांगितले होते.
फ्ल्यूरल इफ्यूजन म्हणजे काय?छातीत फुफ्फुसांच्या चारही बाजूंनी पाणी जमा होणे याला वैद्यकीय भाषेत फ्ल्यूरल इफ्यूजन म्हटले जाते. छातीत पाणी जमा झाल्याने फुफ्फुसांवर ताण येऊन रूग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवतो.