गेल्या आठवड्यात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. अभिनेते नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनीही दिलीप कुमार यांच्या निधनावर शोकसंवेदना व्यक्त केल्यात. नसीर दिलीप कुमार यांचे मोठे चाहते होते. पण भारतीय सिनेसृष्टीतील दिलीप कुमार यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मात्र त्यांचं मतं काहीसं वेगळं आहे.‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये लिहिलेल्या एका लेखात नसीर यांनी आपलं हे परखड मतं मांडलं आहे. दिलीप कुमार नि:संशय बॉलिवूडचे एक दिग्गज कलाकार होते. पण हिंदी चित्रपटसृष्टीत किंवा नव्या कलाकारांना पुढे नेण्यात त्यांचं फार विशेष योगदान नाही, असं नसीर यांनी या लेखात स्पष्टपणे नमूद केलं आहे.
नसीर लिहितात...दिलीप कुमार यांच्या स्टाईलने भारतीय चित्रपटांत एक किर्तीमान स्थापन केला. अनेक कलाकांरांनी पुढे त्यांची स्टाईल कॉपी करण्याचे प्रयत्न केलेत. पण कुणालाही ते जमलं नाही. दिलीप कुमार एक महान अभिनेते होते. पण ज्या उंचीवर ते होते, त्याठिकाणी त्यांनी अभिनयाशिवाय अन्य काहीही केले नाही. त्यांच्या अनुभवाचा फायदा इतरांना होईल असं काहीही खास त्यांनी केलं नाही. 1970 च्या सुरूवातीचे सिनेमे वगळता त्यांनी येणाºया कलाकारांसाठी काहीही खास शिकवण मागे सोडली नाही. दिलीप कुमार यांची उपस्थिती सिनेमाला एक वेगळी उंची द्यायची. पण इतकं स्टारडम असूनही त्यांनी विशेष असं काहीही केलं नाही..., असं नसीर यांनी आपल्या लेखात लिहिलं आहे.