रूपेरी पडद्यावर अनेक प्रेमकहाण्या तुम्ही आम्ही पाहतो. पण या पडद्याआडही अनेक प्रेमकथा रंगल्या. काही लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचल्या तर काही अधु-या राहिल्या. अशीच एक अधुरी प्रेम कहाणी होती मधुबाला वदिलीप कुमार यांची. दिलीप कुमार यांच्यावर मधुबाला वेड्यासारखे प्रेम करायची. पण यादरम्यान असे काही घडले की, ही प्रेमकहाणी कायमची अधुरी राहिली.
होय, 1951 साली ‘तराना’च्या सेटवर मधुबाला (Madhubala) व दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. दोघेही पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दिलीप कुमार यांना गुलाबाचे फुल आणि एक प्रेमपत्र पाठवत मधुबालाने आपले प्रेम व्यक्त केले होते. दोघांची प्रेमकहाणी बहरत असताना मधुबालाचे वडिल अयातुल्ला खान यांना त्याची भणक लागली आणि त्यांनी या नात्याला विरोध केला. असे म्हणतात की, मधुबाला आणि दिलीपकुमार यांचे लग्न झाले तर आपला आर्थिक स्रोत संपेल, या भीतीने मधुबालाच्या वडिलांनी विरोध केला होता.
बी. आर. चोप्रा यांच्या ‘नया दौर’ मध्ये मधुबाला व दिलीप कुमार लीड रोलमध्ये होते. भोपाळमध्ये 40 दिवस शूटिंग ठरले होते. पण मधुबालाला आऊट डोअर शूटींगसाठी पाठवण्यास तिचे वडील मानेनात. मधुबालाही वडिलांच्या आग्रहाबाहेर नव्हत्या. अखेर नाईलाजास्तव बी. आर. चोप्रा यांनी मधुबालाऐवजी वैजयंतीमालाला चित्रपटासाठी साईन केले. मधुबालाला काढून वैजयंतीमालाला साईन करण्याचे हे प्रकरण इतके विकोपाला गेले की, अखेर कोर्टात पोहोचले. या वादासोबत अप्रत्यक्षपणे मधुबाला व दिलीप कुमार यांचे प्रेमप्रकरणही न्यायालयात गेले. न्यायालयात दिलीप कुमार यांनी दिग्दर्शकाची बाजू घेत, मधुबालांविरोधात साक्ष दिली. झाले. दिलीप कुमार यांच्या या साक्षीने मधुबाला प्रचंड दुखावल्या गेल्या.
मतभेद इतके वाढले की, मधुबाला व दिलीप कुमार यांच्यात कधीही न मिटणारे अंतर आले. खरे तर यावेळी आधीपासूनच सुरु असलेले ‘मुगल -ए-आजम’चे शूटींग सुरु होते. यादरम्यान दिलीप कुमार यांना एक सीन शूट करायचा होता ज्यात त्यांना मधुबाला यांना कानाखाली मारायची होती. जेव्हा सीनचे शूटिंग सुरू झाले तेव्हा चिडलेल्या दिलीप साहेबांनी मधुबाला यांना एवढ्या जोरात मारले की, त्या बेशुद्ध झाल्या बऱ्याच वेळाने त्या शुद्धीवर आल्या. मधुबालाच्या वडिलांना दिलीप अजिबात आवडत नसल्यामुळे ते वेगळे झाले, असे म्हटले जाते. एक लव्हस्टोरी कायमची संपली होती...