ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १६ - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांची पत्नी सायरा बानू यांनी दिली आहे. सायरा बानू यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. दिलीप कुमार यांना श्वसनाच्या समस्येमुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून दिलीप कुमार यांना अस्वस्थ वाटत होते, शुक्रवारी त्यांना जास्त त्रास व्हायला लागल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
'दिलीप कुमार यांना ताप आणि छातीत संसर्ग झाल्याने 15 एप्रिलच्या रात्री लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. देवाच्या कृपेने दिलीप कुमार यांची प्रकृती सुधारत असून सध्या स्थिर आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आलं आहे. हॉस्पिटमधील रुममध्ये ते आहेत त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेलं नाही. ती फक्त अफवा आहे', अशी माहिती सायरा बानू यांनी दिली आहे.
दरम्यान डॉक्टरांनी त्यांना 72 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. 'ते आजारी असल्याचा फोन आला होता. त्यांना ताप आला होता, थोडी उलटीही झाली होती. त्यांना न्युमोनिया झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भर्ती करणं योग्य असल्याचं मी सुचवलं होतं', अशी माहिती डॉक्टर जलील पारकर यांनी दिली आहे.