दिलीप कुमार यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. रविवारी रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात पुन्हा एकदा दाखल करण्यात आले आहे. 95 वर्षीय दिलीप कुमार यांना निमोनिया झाला आहे.ज्याची माहिती त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर देण्यात आली आहे. फैजल फारूखी हे दिलीप कुमार यांचे निकटवर्तीय असून त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या स्वास्थासाठी प्रार्थना करा. तुम्हाला ट्विटर व्दारे माहिती देत राहू. छातीत दुखू लागल्याने ५ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांना वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर २४ सप्टेंबरला त्यांच्या तब्येत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
ट्रेजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीपकुमार १९९८ मध्ये आलेल्या ‘किला’ या चित्रपटात अखेरचे अभिनय करताना दिसले. त्यांनी १९४४ मध्ये आपल्या अभिनयाला सुरुवात केली. ‘ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. तब्बल सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. आपल्या विशिष्ट अभिनय शैलीने त्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. इंडस्ट्रीमध्ये त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. आतापर्यंत त्यांना आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीत फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीच्या सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.