डिंपल कपाडियाचा भाचा करण कपाडिया लवकरच ‘ब्लँक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. (करण हा डिंपल यांची बहीण सिंपल कपाडिया मुलगा आहे. सिंपलच्या मृत्यूनंतर डिंपल यांनीच करणला सांभाळले. त्यामुळे करण डिंपल यांना अगदी आईसारखे मानतो.) या चित्रपटात सनी देओलही मुख्य भूमिकेत आहे. खरे तर भाच्याच्या बॉलिवूड डेब्यूसाठी डिंपल प्रचंड खटाटोप करतेय. पण ‘ब्लँक’च्या प्रमोशनल इव्हेंटपासून मात्र दूर पळतेय. आता असे का? तर याचे उत्तर तुम्हीही जाणताच.‘ब्लँक’ चित्रपटाच्या एकाही प्रमोशनल इव्हेंटमध्ये डिंपल दिसली नाही. अलीकडे भाच्याच्या बॉलिवूड लॉन्चच्या आनंदात डिंपलने एक शानदार पार्टी दिली. या पार्टीला संपूर्ण कपाडिया कुटुंब आणि सनी देओल हजर राहिल, असे तिच्या पीआरकडून मीडियाला सांगण्यात आले. पण पार्टी संपायची वेळ आली तरी डिंपल पोहोचली नाही. याचे कारण म्हणजे सनी देओल.
होय, चर्चा खरी मानाल तर, डिंपलने भाच्याच्या लॉन्चसाठी सनी देओलची मदत घेतली. पण याचवेळी ती आणि सनी कुठेही, कुठल्याही प्रकारे एका फ्रेममध्ये येऊ नये, याचेही भान ठेवले. भाच्याचे प्रमोशन करताना चुकून आपण एकत्र आलोच तर मीडियात पुन्हा नाही-नाही त्या चर्चांचे पेव फुटेल, ही भीती तिला होती आणि तिची ही भीती अवास्तवही नव्हती. याचमुळे ‘ब्लँक’च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये ती कुठेही दिसली नाही. पार्टीला येण्याचा निर्णय ऐनवेळी तिने बदलला तोही याचमुळे.