Join us

दिग्दर्शक गजेंद्र अहिरेची या सिनेमामुळे पूर्ण होणार हाफ सेंच्युरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 13:22 IST

गजेंद्र अहिरे सांगतात की ‘हे सातत्य राखण्यासाठी, टिकून राहण्यासाठी खूप बळ आवश्यक असतं.

दिग्दर्शक गजेंद्र अहिरेच्या प्रत्येक सिनेमात एक नवी गोष्ट असते. आणि ती प्रत्येक गोष्ट फिरत असते एका स्त्री भोवती,  तिच्या बाईपणाभोवती, तिच्या संघर्षांभोवती. ‘गुलमोहोर’ मधली विद्या असो किंवा ‘सरीवर सरी’ मधली मनी, ‘मिसेस राऊत’ असो किंवा ‘बयो’. प्रत्येक जण एका तीव्र संघर्षातून जात सामाजिक चौकटी ओलांडत जगते. बाईतलं बाईपण इतक्या प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक असलेलं अत्यंत संवेदनशील मन फार कमी पुरुषांकडे असतं. आणि ते गजेंद्र अहिरेंकडे आहे. 

स्वतः गजेंद्र अहिरे आणि त्यांची फिल्म दोघांनी ५० वर्षांच्या मैलाचा दगड गाठला आहे. अवघ्या सतरा वर्षांमधे ५० फिल्म्स करणं आणि त्यातली प्रत्येक फिल्म ही अत्यंत संवेदनशील गोष्ट मांडणारी असणं ही आज आपल्या सिनेजगतात अप्रूप वाटण्यासारखी आणि म्हणूनच नोंदवून ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ५० फिल्म्स मधल्या ५० वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला तर लक्षात येतं की गजेंद्र अहिरेंनी केवळ फिल्म्स नाही बनवल्या तर त्यातून एक नवीन स्त्रीसाहित्य निर्माण केलं आहे. 

या समोर येणा-या ५० गोष्टींमागे समोर न येणा-या २५० गोष्टीही आहेत. केवळ कथा आणि दिग्दर्शनाशिवाय गीतकार म्हणून, नाटककार म्हणून आणि श्रीमान श्रीमती सारख्या मालिकांसाठी केलेलं लिखाण हे गजेंद्र अहिरेंच्या आजवरच्या कारकिर्दीतील अजून एक वेगळं पण अत्यंत महत्वाचं अंग आहे. जगभरच्या अनेक फिल्म फेस्टीवल्समध्ये असंख्य पारितोषिके गजेंद्र अहिरेंच्या फिल्म्सनी मिळवली आहेत. अत्यंत कमी वेळात दर्जेदार आणि प्रभावी फिल्म बनवण्याची शैली आहे तिची विशेष दखल स्वीडनमधील एका प्रतिष्ठीत विद्यापिठाने घेतली आहे. 

गजेंद्र अहिरे सांगतात की ‘हे सातत्य राखण्यासाठी, टिकून राहण्यासाठी खूप बळ आवश्यक असतं. आणि कायम असमाधानी भावना जाणवत राहण्यातून हे बळ मला मिळत राहतं. एक फिल्म पूर्ण झाली की पुढची फिल्म बनवण्याची, पुन्हा एक नवीन प्रयोग करून पाहण्याची अस्वस्थताच माझ्या निर्मितीमागची प्रेरणा असते. 

प्रत्येकाची जाणीव ही वेगळी असते. गजेंद्र अहिरेंची फिल्म पाहताना हिच भावना असते. एक अमूर्त चित्र किंवा एक वाहणारी कविता. जी समजली असं वाटतानाच अनोळखीही वाटू लागते आणि पुन्हा आपलीही वाटू लागते. ती कविता अखंड वाहत राहते. वेगवेगळ्या काळांच्या, वेगवेगळ्या जाणिवांच्या चौकटी ओलांडत ती रूप बदलते पण गाभा तोच राहतो. 

कशा ना कशाच्या मागे सतत धावणा-या आपल्या सारख्या सामान्य माणसांच्या जगात जिथे आज संवेदना हरवत चालल्या आहेत. तिथे गजेंद्र अहिरेंचा सिनेमा त्या संवेदना पुन्हा रूजवण्याचं काम करतो आहे. आपल्या चित्रपटसृष्टीत या गुणी, प्रतिभावान दिग्दर्शकाचं असणं ही एक बहूमुल्य गोष्ट आहे. त्यांच्या ‘द सायलेन्स’ या सिनेमातल्या रघुवीर यादवांनी साकारलेल्या भूमिकेतला बाप आपल्या लेकिने सोसलेल्या वेदनेनी व्याकूळ होऊन टाहो फोडतो. त्याची ती आर्तता प्रतिध्वनीत होत राहते. गजेंद्र अहिरेंच्या प्रत्येक सिनेमानंतर बरोब्बर हिच जाणीव होते. ती वेदना आपल्या आत प्रतिध्वनीत होत राहते... आयुष्यभर.

 

टॅग्स :गजेंद्र अहिरे