सध्या कुणाल कामराचं (kunal kamra) प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. स्टँड अप शोमध्ये कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यावर आक्षेपार्ह कविता केल्याप्रकरणी कॉमेडियन चांगलाच अडचणीत सापडला आहे. कुणालचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी खारमधील स्टुडिओची तोडफोडही केली. याविषयी दिग्दर्शक हंसल मेहतांनी कुणाल कामराला सपोर्ट केला असून शिवसेनेवर आरोप केल्याची चर्चा आहे.हंसल मेहतांनी इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करुन २५ वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाने त्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा खुलासा केला आहे. २५ वर्षांपूर्वी हंसल मेहतांनी 'दिल पे मल ले यार' हा पहिला सिनेमा बनवला होता. या सिनेमात मनोज वाजपेयी प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमातील एका आक्षेपार्ह संवादामुळे राजकीय पक्षाच्या गुंडांनी त्यांच्या ऑफिसमध्ये तोडफोड केली होती. हंसल म्हणाले की, "कुणाल कामरासोबत जे काही झालं ते दुःखद आहे. महाराष्ट्रासाठी अशी घटना नवीन नाही. मी स्वतःही हे अनुभवं आहे."
हंसल मेहता पुढे लिहितात की, "त्यावेळेच्या अविभाजीत राजकीय पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये तोडफोड करुन मला मारहाण केली. माझ्या तोंडावर काळं फासलं. याशिवाय एका ज्येष्ठ महिलेच्या पाया पडून मला जाहीर माफी मागण्यासाठी जबरदस्ती केली. तो संवाद कोणालाही नुकसान पोहोचवणारा नव्हता. २७ कट्स सुचवून सेन्सॉर बोर्डाने आधीच या सिनेमाला मंजुरी दिली होती. परंतु तरीही काही फरक पडला नाही."
"मी जेव्हा माफी मागितली तेव्हा या संपूर्ण घटनेची देखरेख करण्यासाठी कमीत कमी २० राजकीय व्यक्ती तिथे उपस्थित होत्या. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट होती. दहा हजार लोक आणि मुंबई पोलीस शांतपणे बघत होते. या घटनेने मला केवळ शारीरिक नाही तर मानसिक त्रासही सहन करावा लागला. त्यामुळे माझ्या फिल्ममेकिंगला मर्यादा आली आणि हिंमत कमी झाली. माझ्या थंड पडलेल्या संवेदना पुन्हा जागरुक व्हायला अनेक महिने लोटले."
हंसल मेहता शेवटी लिहितात की, "मतभेद कितीही खोल असले तरीही हिंसा, अपमान आणि धमक्यांचं आपण कधीही समर्थन करु शकत नाही. स्वतःची आणि इतरांची प्रगती करण्याचा आपल्याला हक्क आहे. स्वतःचा सन्मान करण्याचा आपल्याला हक्क आहे."