Join us

'पुढच्या पिढीला कळावं की..'; १ मे ला केदार शिंदे करणार महत्त्वपूर्ण घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 4:12 PM

Maharashtra shahir: शाहीर साबळे यांचे नातू लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे आपल्या आजोबांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर करणार आहेत.

शाहीर साबळे हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. आपल्या पहाडी आवाजात त्याने अनेक गाणी अजरामर केली.  'महाराष्ट्राची लोकधारा', 'जय जय महाराष्ट्र' यांच्या माध्यमातून शाहीर साबळे यांनी प्रत्येक रसिकप्रेक्षकाच्या मनावर एक छाप उमटवली. विशेष म्हणजे त्यांचा इतिहास, त्यांचा जीवन प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. शाहीर साबळे यांचे नातू लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे आपल्या आजोबांचा हा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर करणार आहेत. येत्या १ मे २०२२ रोजी केदार शिंदे या चित्रपटाविषयी  एक मोठी घोषणा करणार आहेत. याविषयी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातून शाहीर साबळे यांचा प्रवास उलगडला जाणार आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शक केदार शिंदे करणार असून पटकथा आणि संवाद प्रतिमा कुलकर्णी यांचे आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा आहे. या चर्चांमध्येच केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर करत १ मे रोजी चित्रपटाविषयी मोठी घोषणा करणार असं स्पष्ट केलं आहे.

"बाबा (शाहीर साबळे) आज तुमचा स्मृतिदिन.. आणि हे तुमचं जन्मशताब्दी वर्ष... पुढच्या पिढीला कळावं की, कोण शाहीर साबळे होते? आणि मुळात शाहीर म्हणजे काय? यासाठी माझा हा प्रयत्न. येत्या १ मे २०२२ रोजी या चित्रपटाविषयी आणखी महत्वपूर्ण घोषणा करणार आहे. रसिकांनी तुमच्यावर आतोनात प्रेम केल. पण आता पिढी बदलली आहे. पण या पिढीचे वडिलधारी त्यांना नक्कीच सांगतील की, शाहीर साबळे काय होते....  तुमचाच, केदार", अशी पोस्ट केदार शिंदे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे.

दरम्यान, गेल्या अडीच-तीन वर्षांपासून केदार शिंदे या चित्रपटावर काम करत असल्याचं सांगण्यात येतं. 'जय जय महाराष्ट्र माझा', 'जेजुरीच्या खंडेराया', 'या गो दांड्यावरून' ही शाहीर साबळे यांची अजरामर झालेली गाणीही या चित्रपटात असणार असल्याचं सांगण्यात येतं.

टॅग्स :केदार शिंदेसिनेमासेलिब्रिटी