बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा विजेता सूरज चव्हाण झाला. सूरज जिंकताच संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. सूरज जिंकताच कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड आणि सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक केदार शिंदेंनी त्याला सिनेमाची ऑफर दिली. 'झापुकझुपुक' असं केदार शिंदेंनी ऑफर केलेल्या सिनेमाचं नाव असून यात सूरज प्रमुख भूमिका साकारणार आहे. अचानक सूरजला बिग बॉसच्या मंचावर सिनेमाची ऑफर कशी दिली? याविषयी केदार शिंदेंनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय.
सूरजसाठी सिनेमा जाहीर का केला? सूरजला सिनेमाची ऑफर देण्यामागे काय विचार आहे? असा प्रश्न केदार शिंदेंना विचारला असता ते म्हणाले, "सूरज जेव्हा बिग बॉसमध्ये जायचा नव्हता त्यादिवशी पहिल्यांदा मी सूरजला भेटलो होतो. बऱ्याच जवळच्या लोकांचं म्हणणं होतं की सूरजला बिग बॉसमध्ये पाठवू नये. पण मी सूरजशी पाच-दहा मिनिटं बोलल्यावर मला त्याच्यामध्ये एक वेगळा अवलिया दिसला होता. त्याक्षणी माझ्या डोक्यामध्ये ही गोष्ट सुरु झाली. माझ्या डोक्यामध्ये सिनेमाची गोष्ट अशी आहे की, त्याला अशा पद्धतीचा माणूस मिळणं अपेक्षित होतं. मी स्वामींना खूप मानतो. माझ्याकडे गोष्ट आहे म्हटल्यावर ती व्यक्ती स्वामींनी अलगद माझ्यासमोर आणून ठेवली."
केदार शिंदे पुढे म्हणाले, "योगायोगाने सूरज बिग बॉसमध्ये गेला. आज तो बिग बॉसचा विनर आहे. मला असं वाटतं की हे फक्त क्षणभंगुर राहू नये. एका व्यक्तीबद्दल आपण विचार करतो तो फक्त तीन महिन्याचा राहू नये. त्या व्यक्तीमध्ये वेगळ्या गोष्टी किंवा टॅलेंट दडलं असेल तर माझ्यासाठीही हा वेगळा प्रयोग असेल. हे चॅलेंज घ्यायला, सूरजबरोबर काम करायला मला आवडेल. मला पण कोणीतरी अशी संधी दिली होती. माझं घराणं वेगळं असलं तरी मला कोणी अचानक नाटक, सिनेमा दिलं नव्हतं. त्याच्यालेखी त्याने खूप धडपड केली असेल. त्यामुळे जेव्हा तो सिनेमा येईल तेव्हा सर्वांना जाणवेल की हा रोल फक्त सूरजच करु शकतो."
केदार शिंदे शेवटी म्हणाले, "अशी कशी संधी मिळू शकते? असं कोणी विचारल्यावर त्या त्या लोकांनी असा विचार केला पाहिजे की आजपर्यंत मला नवीन लोकांबरोबर काम करायला कोणतीच भीती नाही.'अगं बाई अरेच्चा'मध्ये माझी पहिली हिरोईन होती प्रियंका यादव, 'जत्रा'मध्ये क्रांती रेडकरने, 'यंदा कर्तव्य आहे'मध्ये स्मिता शेवाळेने, 'बकुळा नामदेव घोटाळे'मध्ये सोनाली कुलकर्णीने माझ्याबरोबर डेब्यू केला होता. सिद्धार्थने माझ्याबरोबर पहिल्यांदा काम केलंय. त्यामुळे जे असा विचार करत आहेत त्यांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवावा. त्याचा विचार जास्त करावा. 'बाईपण..'च्या अगोदर जेव्हा बाकीच्यांचे सिनेमे गाजत होते तेव्हा मी असा विचार करत बसलो असतो तर 'महाराष्ट्र शाहीर' आणि 'बाईपण भारी देवा' आला नसता. मी माझ्या कामाकडे लक्ष दिलं. त्यामुळे त्या लोकांनी त्यांच्या कामाकडे लक्ष दिलं तर १००% त्यांना ह्यापेक्षा जास्त काम मिळेल. हा विचार करणाऱ्यांची नावं मला कळली तर केदार शिंदे आणि कलर्स मराठी त्याला ब्लॅकलिस्ट करतील हा संकुचित विचार आहे. कोणीच कोणाला मोठं करत नाही. त्या त्या व्यक्तीची गरज आम्हालाही आहे. त्यामुळे मी त्यांचा मान राखेल आणि त्यांनीही माझा मान राखावा. बिनधास्त यावं, सगळ्यांसाठी दरवाजे उघडे आहेत."