‘फॅन्ड्री’ हा सिनेमा म्हणजे नागराज मंजुळे यांची अप्रतिम कलाकृती आहे. समाजाचे वास्तव मांडणा-या या सिनेमाने प्रेक्षक आणि समीक्षक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात काम करणारेही अस्सल ग्रामीण बाज असलेले कलाकार होते. सोलापूर जिल्ह्यातील सोमनाथ अवघडे याने चित्रपटात जब्याची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. तर अभिनेत्री म्हणून नागराज यांनी राजेश्वरी खरात हिची निवड केली होती. तिने साकारलेली शालूची भूमिकाही प्रचंड गाजली होती़. तिच्या चेह-यावरचे हावभाव, तिचा सहजसुंदर अभिनय चाहत्यांना भावला होता. ही शालू आज कुठे आहे?
शालू साकारणारी राजेश्वरी खरात हिला नागराज यांनी पहिल्यांदा पुण्यात पाहिले होते. फॅन्ड्रीसाठी तिचा एकच चेहरा नागराज यांच्या डोळ्यांपुढे येत होता. पण तिचा शोध लागेना. अनेक प्रयत्नानंतर तिचा शोध लागला. पण पोरीला चित्रपटात काम करू देण्यास तिचे आईवडील तयार होईनात.
नागराज यांनी बरीच समजूत काढल्यानंतर राजेश्वरीच्या आईवडिलांनी परवानगी दिली आणि राजेश्वरी कॅमे-यापुढे उभी झाली.