Join us

'मत मांडणं हा प्रेक्षकांचा हक्कच,पण..'; ट्रोलिंगवर 'छत्रीवाली'च्या दिग्दर्शकांचं थेट भाष्य

By शर्वरी जोशी | Published: January 12, 2022 6:30 PM

Tejas deoskar : सध्याच्या काळात सर्वाधिक ट्रोलिंग हे कलाविश्वातील सेलिब्रिटींवर होत असल्याचं दिसून येतं. यात चित्रपटाची कथा किंवा कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना पटला नाही तर ते ट्रोलिंगला सुरुवात करतात.

सध्याच्या काळात सोशल मीडिया प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे अनेक जण आपलं मत मांडण्यांसाठी या माध्यमाचा आधार घेतात. समाजात न पटणारी किंवा मनाला न आवडलेली एखादी घटना वा गोष्ट घडली की नेटकरी लगेच सोशल मीडियावर व्यक्त होतात. यात अनेकदा ट्रोलिंगदेखील घडून येत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे सध्याच्या काळात सर्वाधिक ट्रोलिंग हे कलाविश्वातील सेलिब्रिटींवर होत असल्याचं दिसून येतं. यात चित्रपटाची कथा किंवा कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना पटला नाही तर ते ट्रोलिंगला सुरुवात करतात.यात अनेकदा ट्रोलर्स या सेलिब्रिटींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरुनही ट्रोल करतात.  त्यामुळेच कलाविश्वातील ही मंडळी या ट्रोलिंगचा सामना कसा करतात हे दिग्दर्शक तेजस देऊस्कर ( tejas deoskar) यांनी 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

"प्रत्येकाला त्याच मत मांडायची संधी पण आहे आणि आता डिजिटल माध्यमातून त्यांना त्यांच मतही मांडताही येतंय. त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दल किंवा विषयावर कोणाला मत मांडायचंय असेल तर त्यांनी ते जरुर मांडावं. पण, मत मांडणं आणि एखादं स्टेटमेंट करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मत मांडायला सगळ्यांनाच मुभा आहे. मात्र, स्टेटमेंट करतांना आपल्यात ती प्रगल्भता आहे का ?" हे पाहायला हवं, असं तेजस म्हणाले.

पुढे ते म्हणतात,  "आपण मांडलेल्या स्टेटमेंटला लोक गांभीर्याने घेतील का हे तपासून पाहणंदेखील गरजेचं आहे. उदा. १० वीमधील मुलाने पीएचडी करणाऱ्या मुलाला त्याच्याच अभ्यासक्रमातील एखादी गोष्टी सांगायला किंवा शिकवायला सुरुवात केली. तर, सहाजिकच या दहावीतील मुलाला त्या अभ्यासक्रमाची किंवा त्याविषयाची पुरेशी माहिती किंवा जाणीव नाही हे लक्षात येतं. त्यामुळे अशा प्रकारचं जे ट्रोलिंग होतं त्याकडे आम्ही कधीच लक्ष देत नाही. किंबहुना त्याला तितकसं महत्त्वही देत नाही."

दरम्यान, 'बाबा', 'बकेट लिस्ट' या चित्रपटांच्या यशानंतर तेजस देऊस्कर यांचा 'छत्रीवाली' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिका साकारत आहे. तसंच या चित्रपटातून समाजप्रबोधनपर संदेश देण्यात आलेला आहे.  

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन