Join us

रजनीकांतच्या चाहत्यांच्या पदरी निराशा; मुंबईतील 'या' चित्रपटगृहाने दिला ‘अन्नत्थे’च्या प्रदर्शनास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 4:00 PM

annatathe: मुंबईतील एका प्रसिद्ध सिनेमागृहाने रजनीकांत यांचा 'अन्नत्थे' या चित्रपटाच्या प्रदर्शनास नकार दिला आहे. त्यामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि थलायवा म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत (rajinikanth) यांचे आज जगभरात असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. उत्तम अभिनय आणि साहसदृश्यांच्या जोरावर हा अभिनेता आज गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. वयाची सत्तरी पार केल्यानंतरही त्यांचा कलाविश्वात सक्रीय सहभाग असल्याचं दिसून येतं. अलिकडेच त्यांचा 'अन्नत्थे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. रजनीकांत यांचा कोणताही चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक तुफान गर्दी करत असतात. विशेष म्हणजे मुंबईतही त्यांच्या चित्रपटांसाठी असाच प्रतिसाद मिळतो. परंतु, मुंबईतील एका प्रसिद्ध सिनेमागृहाने रजनीकांत यांचा 'अन्नत्थे' (annatathe) या चित्रपटाच्या प्रदर्शनास नकार दिला आहे. त्यामुळे सध्या रजनीकांत यांच्या चाहत्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत.

'टाइम्स ऑफ इंडिया'नुसार, रजनीकांत यांच्या ‘अन्नत्थेला बंपर ओपनिंग मिळेल, असा अंदाज वर्तवला जात असतानाच मुंबईतील सर्वोत्कृष्ट सिनेमा हॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरोरा थिएटर या चित्रपटाच्या प्रदर्शनास नकार दिला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटगृहात रजनीकांत यांचे असंख्य चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र, अन्नत्थे हा प्रदर्शित होणार नसल्याचं दिसून येत आहे.

नंबी राजन हे रजनीकांत यांचे मोठे चाहते असून ते गेल्या ३० वर्षांपासून थलायवाचे सगळे चित्रपट प्रदर्शित करतात. परंतु, यावर्षी काही मोठ्या कंपन्यांनी वितरण क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे आणि  सरकारने ५० टक्के क्षमतेनेच चित्रपट गृह सुरु करण्याच्या नियमामुळे यंदा रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही, असं नंबी राजन यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, “ माझं थिएटर आतून थोडं खराब झालं आहे. पण मला चित्रपटाचं वितरण मिळालं असतं तर मी ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला असता. पण, आता ते शक्य नाही आणि हीच माझ्यासाठी पार निराशाजनक गोष्ट आहे.

दरम्यान, रजनीकांत यांचा 'अन्नत्थे' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात रजनीकांत हे मुख्य भूमिकेत झळकले आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट देशासह विदेशातही प्रदर्शित झाला आहे. संयुक्त अरब अमीरातमध्ये ११७ स्क्रीन, मलेशिया ११०, सिंगापूर २३, श्रीलंका ८६ इतक्या चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचं स्क्रिनिंग होणार आहे.

टॅग्स :रजनीकांतTollywoodसिनेमासेलिब्रिटी