Join us

'लाखात एक आमचा दादा' मालिकेतून मुख्य अभिनेत्रीची एक्झिट, आता तुळजाची भूमिका कोण साकारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:43 IST

'या' कारणामुळे दिशा परदेशीने सोडली मालिका, आता 'सुख म्हणजे...' फेम अभिनेत्री साकारणार तुळजाची भूमिका

'लाखात एक आमचा दादा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. मालिकेत अभिनेता नितिश चव्हाण सूर्यादादाची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री दिशा परदेशी तुळजाच्या भूमिकेत आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत सूर्या दादा आणि तुळजाच्या प्रेमाला बहर आलेला असतानाच 'लाखात एक आमचा दादा'मधून मुख्य अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे. 

तुळजाची भूमिका साकारणाऱ्या दिशा परदेशी हिने मालिका सोडल्याचं वृत्त आहे. आता तिच्या जागी नवी अभिनेत्री मालिकेत तुळजाची भूमिका साकारणार आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्रीची 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत एन्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री आता तुळजाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर आता नवी तुळजा बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता मृण्मयी तुळजाच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणार का, हे पाहावं लागेल. 

मृण्मयी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिने राजमा ही भूमिका साकारली होती. 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' या मालिकेतही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता ती 'लाखात एक आमचा दादा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

दरम्यान, दिशाने आरोग्याच्या कारणामुळे ही मालिका सोडली आहे. "सर्वांना प्रश्न पडला असेल की मी मालिका का सोडतेय, तर मी म्हणेन आरोग्याच्या पलीकडे काहीही नाही आणि या कारणामुळे मला मना विरोधात जाऊन  'लाखात एक आमचा दादा' मालिकेला निरोप द्यावा लागत आहे. मी खूप प्रयत्न केला यातून बाहेर पडण्याचा पण डॉक्टरांच्या सल्ला आहे की मला आरामाची गरज आहे. मी आणि मालिकेच्या टीमने खूप मेहनत घेतली तुळजा साकारण्यासाठी.  मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही या तुळजाला दिलं तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम नवीन तुळजाला द्याल. मी जरी मालिका सोडून जात असले तरीही ही माझीच मालिका आहे असं मी नेहमीच म्हणत राहीन. कारण या प्रवासात मी पहिल्या दिवसापासून जोडली गेली आहे. जरी हा प्रवास माझा इथे थांबला असेल तरी मी " लाखात एक आमचा दादा" मालिकेचा सदैव भाग राहीन", असं दिशा म्हणाली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी