Khusboo Patani: अभिनेत्री दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी हिच्यावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. खुशबूनं बेवारस अवस्थेत पडलेल्या चिमुरडीचा जीव वाचवला आहे. खुशूबच्या घराच्या मागे एक पडिक जागेत कोणीतरी मुलीला सोडून गेल्याचं खुशबूनं सांगितलं. पाटनी कुटुंबान चिमुरडीला बरेली पोलिसांच्या स्वाधीन केलं असून तिचं नाव राधा असं ठेवलं आहे.
खुशबू पाटनीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगी मातीत पडून रडताना दिसत आहे. बरेलीमधील त्याच्या घराजवळील एका पडिक जागेत खुशबूच्या आईला सर्वांत पहिल्यांदा बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला होता. त्यानंतर खुशबू भिंतीवरून उडी मारून त्या चिमुकलीपर्यंत पोहचली. व्हिडीओमध्ये खुशबूनं चिमुरडीच्या जखमा दाखवल्या. तसेच आपल्या मुलीला असं बेवारस अवस्थेत सोडून जाणाऱ्या पालकांवर तिनं संताप व्यक्त केला. व्हिडीओमध्ये ती म्हणते, "जर तू बरेलीची आहेस आणि ही तुझी मुलगी आहे, तर आम्हाला सांग की आईवडील तिला इथे कसे सोडून गेले. मला अशा पालकांची लाज वाटते".
या व्हिडीओसोबत खुशबूने एक लांबलचक कॅप्शन लिहिलं, "ज्याचे रक्षण परमेश्वर करतो, त्याला कोणीही हानी पोहोचवू शकत नाही. मला आशा आहे की अधिकारी तिची काळजी घेतील आणि पुढील सर्व कार्यवाही ही योग्य नियम आणि कायद्यनुसार पार पडेल". यासोबतच खुशबूनं बरेली पोलिस, यूपी पोलिस, मुख्यमंत्री योगी, महिला आणि बाल विकास मंत्रालय, पंतप्रधान मोदी आणि महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना तिची पोस्ट टॅग केली आहे.
खुशबूने राज्य आणि केंद्र सरकारला आवाहन करत लिहलं, "कृपया आपल्या देशातील मुलींना वाचवा!' हे सगळं किती काळ चालणार? ती योग्य हातात जाईल आणि त्यानंतर तिचं जीवन समृद्ध होईल याची मी खात्री करेन. एखाद्याच्या नशिबात जे घडतं ते चांगलंच असते. ते कोणीही बदलू शकत नाही".
खुशबूच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्यात. खुशबू पाटनीच्या या पोस्टवर तिची बहीण दिशा पाटनीने लिहिलं, 'तुला आणि लहान मुलीला खूप आशीर्वाद'. याशिवाय भूमी पेडणेकरनेही कमेंट केली की, "देव त्या मुलीला आणि तुला आशीर्वाद देवो". खुशबू पाटनी ही माजी लष्करी अधिकारी आहे. खूशबू दिशाप्रमाणेच सुंदर आणि फीट आहे. अनेकदा दिशाच्या व्हिडिओ, फोटोमध्ये तिची झलक दिसते. तिने डेहराडूनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केलं आहे.