प्रसाद लाड, मुंबई : तरुणाईचा सुरु असलेला जागर... युवा नाट्यकर्मींचा सळसळता उत्साह, एकांकिकांच्या विषयांमधील विविध छटा, सादरीकरणातील वैविध्य आणि सवाई या नावाला जागणारे सादर करण्याता आलेले प्रयोग... या सर्व गोष्टींचा मिलाप जमून आल्यामुळेच चतुरंग प्रतिष्ठानची यंदाची सवाई एकांकिका स्पर्धा नाट्यकर्मी आणि माय-बाप रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत अखेर दिशा थिएटर्स आणि ओमकार प्रोडक्शनच्या 'अ बास्टर्ड पॅट्रीऑट'ने बाजी मारली. सर्वोत्तम एकांकिकेसह 'अ बास्टर्ड पॅट्रीऑट' या एकांकिकेने अन्य तीन पुरस्कारांवरही मोहोर उमटवली.
यंदाच्या सवाई स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले ते एकांकिकांचे विषय. आतापर्यंत बऱ्याच स्पर्धांमध्ये एकांकिकांचे विषय भिन्न असतात. पण या स्पर्धेच्या एकांकिकांमध्ये सकसपणा पाहायला मिळाला. त्यामुळेच अखेरच्या क्षणापर्यंत नेमकी कोणती एकांकिका बाजी मारणार, याची याची उत्सुकता ताणली गेली होती. 'अ बास्टर्ड पॅट्रीऑट' ला सर्वोत्तम एकांकिकेचा पुरस्कार जाहीर झाला आणि रवींद्र नाट्यमंदिरात एकच जल्लोश झाला. या एकांकिकेमध्ये 'क्लारा' ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या सिमरन सईदला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर सर्वोत्तम दिग्दर्शक (संकेत पाटील व राजरत्न भोजने) आणि नेपथ्य (तानया कामटे व सागर पेंढारी) हे दोन पुरस्कारही या एकांकिकेला मिळाले.
यंदाच्या सवाईमध्ये आतापर्यंत गाजलेल्या बुद्रुकवाडीचा मारुती बाटला, या रुईया महाविद्यालयाच्या एकांकिकेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर सर्वोत्तम प्रकाश योजनाकार हा पुरस्कार अमोघ फडकेला मिळाला. रंगपंढरी या पुण्यातील संस्थेने निरुपण नावाची एकांकिका सादर केली होती. या एकांकिकेला सर्वोत्तम लेखक (ईश्वर अंधारे, तारा आराध्य) आणि सर्वोत्तम ध्वनी संयोजक (हर्ष राऊत,विजय कापसे) हे पुरस्कार मिळाले.
यंदाच्या सवाईमध्ये सवाई प्रेक्षक पसंती एकांकिका हा पुरस्कार ब्रम्हास्त्र या मुंबईतील एम. डी. महाविद्यालयने पटकावला. त्याचबरोबर या एकांकिकेमधील राजा ही भूमिका साकारणाऱ्या रोहन सुर्वेला सर्वोत्तम अभिनेत्याचाही पुरस्कार मिळाला. यंदाच्या स्पर्धेत द कट, इट हॅपन्स आणि पैठणी या एकांकिकाही सादर झाल्या, पण त्यांना पुरस्कारांपासून वंचित रहावे लागले.
सवाई एकांकिका स्पर्धेचा निकाल : सवाई एकांकिका प्रथम- अ बास्टर्ड पॅट्रीऑट (दिशा थिएटर आणि ओमकार प्रोडक्शन कल्याण)सवाई एकांकिका द्वितीय - बुद्रुकवाडीचा मारुती बाटला (रुईया महाविद्यालय, मुंबई)सवाई लेखक- ईश्वर अंधारे, तारा आराध्य (निरूपण, रंगपंढरी, पुणे) सवाई दिग्दर्शक- संकेत पाटील, राजरत्न भोजने (अ बास्टर्ड पॅट्रीऑट)सवाई अभिनेता- रोहन सुर्वे (ब्रम्हास्त्र, एम. डी. महाविद्यालय, मुंबई)सवाई अभिनेत्री- सिमरन सईद (अ बास्टर्ड पॅट्रीऑट)सवाई प्रकाश योजना-अमोघ फडके (बुद्रुकवाडीचा मारुती बाटला)सवाई ध्वनीसंयोजक- हर्ष राऊत,विजय कापसे (निरूपण)सवाई नेपथ्यकार- तानया कामटे, सागर पेंढारी (अ बास्टर्ड पॅट्रीऑट)सवाई प्रेक्षक पसंती एकांकिका- ब्रम्हास्त्र (: एम. डी. महाविद्यालय, मुंबई).