Join us

दिवाळी : ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ने केली प्रकाशमान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 11:37 AM

दिवाळीचा सण आपण साजरा करतो. अज्ञान, आळस, अस्वच्छता, अंधश्रद्धा, अनीती यांचा अंधार दूर होऊन ज्ञान , उद्योगीपणा, स्वच्छता, वैज्ञानिक दृष्टिकोन, नीती यांचा प्रकाश सर्वत्र पसरो अशी आपण प्रार्थना करूया. तसेच हा दीपावलीचा सण साजरा करता पर्यावरणाचे भान ठेवून आपण इकोफ्रेंडली दीपावली उत्सव साजरा करूया.

- छाया कदम (अभिनेत्री)

दिवाळी म्हटली की एक वेगळाच उत्साह, आनंद आणि हुरूप येतो. प्रत्येक दिवाळी काहीतरी नावीन्यपूर्ण घेऊन येते. माझी मागची दिवाळी कानपासून जगभरातील महत्त्वाच्या सिनेमहोत्सवांत गाजलेल्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ चित्रपटाने प्रकाशमान केली, ‘लापता लेडीज’ ऑस्करवारीवर गेल्याने यंदाची दिवाळी अधिकच उजळली आहे. असे असले तरी पूर्वीच्या दिवाळीच्या आठवणीही मनाच्या पटलावर कायमच्या कोरलेल्या आहेत...

मागच्या वर्षी दिवाळीमध्ये ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ चित्रपटाचे रत्नागिरीमध्ये शूटिंग सुरू होते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी ब्रेक असल्याने पावसजवळ असलेल्या हॅाटेलमध्ये छान पार्टी झाली. त्या पार्टीत पायल कपाडिया, कनी कस्तुरी, दिव्यप्रभा, प्रोडक्शन मॅनेजर पीयूषा चाळके, सिनेमॅटोग्राफर रिकू म्हणजेच रणबीर दास, प्रभाती खरात, सुयश कामत आदी कलाकार-तंत्रज्ञांपासून स्पॉटबॉयपर्यंत सर्व सहभागी झाले होते.

ऑगस्टमध्ये आई गेल्यानंतरची पहिली मला दिवाळी खूप अस्वस्थ करणारी होती, पण संपूर्ण टिममुळे अविस्मरणीय बनली. मागच्या वर्षातील दिवाळी आणि या दिवाळीपर्यंत ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ने खूप गोष्टी घडवून आणल्या. कडक उन्हामध्ये जंगलात शूट करताना संपूर्ण दिवस घामाघूम व्हायचो. दिवाळीचा तो एकच दिवस आम्ही छान तयार होऊन एन्जॅाय केला होता.

पूर्वी आम्ही कलिनामधील हाऊसिंग सोसायटीत राहायचो. सोसायटीत नऊ इमारती होत्या. एका इमारतीत ३२ सदनिका होत्या. तेव्हाची दिवाळी म्हणजे आहाहाहा... फराळ करण्यापासून कंदील बनवून बिल्डिंगमध्ये लावण्यापर्यंत सर्व कामे केली. फराळ बनविण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जायचो.  कोकणात चणे भाजून त्याच्या पुरणाच्या करंज्या बनवल्या जातात. त्या खूप आवडतात. आताही करंज्या करते, पण दिवाळीत करणे होत नाही. पूर्वी सर्वांच्या दारासमोर भगवे कंदील लागायचे. ते बनविण्यासाठी रात्रभर जागरण करायचो. त्या जागरणातही मजा, मस्ती आणि धमाल गप्पा व्हायच्या.

पूर्वीची हाऊसिंग बोर्डमधल्या बिल्डिंग किंवा चाळीतील दिवाळीची गंमत पुढे अनुभवायला मिळणार की नाही हे सांगता येत नाही. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर कोण उठते आणि नवीन कपडे घालून कोण फटाके वाजवते याकडे सर्वांचे लक्ष असायचे. पाच-सहा तास एकाच जागी बसून रांगोळी काढण्यातही एक वेगळी स्पर्धा असायची. आपली रांगोळी इतरांपेक्षा भारी आणि मोठी असायला हवी असे प्रत्येकाला वाटायचे. फटाक्यांची खरेदी अगोदरच केली जायची. दादरला जाऊन नवीन कपडे घेताना उत्सुकता असायची. आता उठ-सूठ कधीही शॉपिंग करतो. 

पूर्वी सोसायटीच्या मधल्या ग्राउंडमध्ये फटाके वाजवताना भारी वाटायचे. लहानपणी स्वत: मजा करण्याच्या नादात लोकांचा विचार केला जात नसायचा. फटाक्यांमुळे आपल्याला मजा येते, पण इतरांना आवाजाचा त्रास होतो, आजारी व्यक्तींच्या आरोग्याला धोका निर्माण होतो हा विचार आता मनात येतो. दिवाळीत भेटीगाठीसाठी पाहुण्यांकडे जाताना ट्रॅफिकमध्ये अडकल्यास आनंदावर विरजण पडण्याची भीती वाटते. दिवाळीत प्रत्येकाकडे वेगवेगळे जाण्याऐवजी एकाच ठिकाणी भेटायला हवे. नुकताच एक कार्यक्रम अटेंड केला. ज्यात अमृता प्रीतमच्या कविता म्हटल्या गेल्या. चार तरुण मुलांनी घरात बैठक मांडून कार्यक्रम सादर केला. विचारांची देवाणघेवाण झाली. यंदा दिवाळीत गावी जाण्याची खूप इच्छा आहे, पण कामांची यादी मोठी असल्याने यंदाची मुंबईतच दिवाळी साजरी करणार आहे.

टॅग्स :बॉलिवूड