Join us

'सुलतान'मधून गाणं काढू नका - जाहीर माफी मागत अरजीतची सलमान खानला विनंती

By admin | Published: May 25, 2016 9:55 AM

प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने सोशल मीडियावरून अभिनेता सलमान खानची जाहीर माफी मागितली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान हा चित्रपटसृष्टीतील अतिशय बडं प्रस्थ असून त्याच्या गुडबूक्समध्ये असणा-यांना चित्रपटसृष्टीत हमखास यश मिळतचं. मात्र तो ज्यांच्यावर नाराज होतो, त्यांच करीअर संपुष्टात यायला वेळ लागत नाही (आठवतोय का ऐश्वर्यावरून सलमान आणि विवेक ओबेरॉय दरम्यान झालेला वाद..?), त्यामुळेच कोणताही कलाकार सलमानच्या वाकड्यात जाण्याची हिंमत करत नाही. याच बाबीचा प्रत्यय प्रसिद्ध गायक अरजित सिंगला नुकताच आला असून त्याने सलमानची जाहीर माफी मागितली. अरिजीतने सोशल मीडिया व फेसबूक अकाऊंटवर एक पोस्ट लिहून सलमानची सपशेल माफी मागितली असून आगामी 'सुलतान' या चित्रपटातून त्याचं गाणं न वगळण्याही विनंती केली आहे. 
काल रात्री अरिजितने त्याच्या फेसबूक अकाऊंटवर एक पोस्टद्वारे सलमानची माफी मागितली आहे, तसेच आपण त्याला प्रत्यक्ष भेटून माफी मागण्याचाही प्रयत्न केल्याचे अरिजीतने म्हटले आहे. 'सुलतान' या चित्रपटातून आपले गाणे न वगळता ते तसेच ठेवावे, अशी विनंतीही त्याने पोस्टमध्ये केली होती. मात्र अवघ्या काही काळानंतर अरिजीतने ही पोस्ट डिलीट केली आहे. 
 
काय म्हटले आहे अरिजीतने पोस्टमध्ये ,
 
Dear Mr Salman Khan, 
मी तुमचा कधीही अपमान केलेला नाही आणि तसा करण्याचा माझा कधी हेतूही नव्हता, ही गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी मी अनेकवेळेस तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र मी अपयशी ठरलो. त्यामुळे (पोस्टचा) हा अखेरचा मार्ग स्वीकारून मी तुमची जाहीर माफी मागतो. सलमान, मी तुमचा अपमान केला, असा तुमचा गैरसमज झाला आहे, मी कधीच तसं वागलेलो नाही. त्यावेळी (शो दरम्यान) जे घडलं ती अतिशय चुकीची वेळ होती. आणि त्याचमुळे तुम्हाला अपमानास्पद वाटलं. 
मी हे समजू शकतो आणि त्याबद्दल मला खूप वाईटही वाटलं, त्यामुळेच मी तुमची क्षमा मागतो. मी आणि माझे कुटुंबिय गेल्या अनेक वर्षांपासून तुमचे फॅन आहोत. मी अनेकवेळेस तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तुम्ही माझी माफी कबूल केली नाहीत. मी तुमची माफी मागत तुम्हाला अनेक मेसेजसही पाठवले आणि हे तुम्हालाही माहीत आहे. 
नीताजींच्या घरीही मी तुमची माफी मागण्यासाठी आलो होतो, पण तुम्ही तेव्हाही मला माफ केलं नाही. माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण म्हणूनच मी आता सर्वांसमोर तुमची माफी मागण्याचे ठरवले आहे. कृपा करून 'सुलतान'मधील माझं गाणं काढू नका, तुम्हाला ते गाणं उतर कोणाकडून गाऊन घ्यायचं असेल तर जरूर घ्या, पण (माझ्या) गाण्याचे मूळ व्हर्जनही तसेच ठेवा. मी आत्तापर्यंत भरूप गाणी गायली आहेत, पण मला तुमच्यासाठी एकतरी गाणं गायची इच्छा आहे, जे मी आयुष्यभर जपून ठेवू इच्छितो!
भाईजान, मी नेहमी तुमचा फॅन राहीन...!
अरिजित सिंग..
 
 
 
सलमान एका अॅवॉर्ड शो होस्ट करत असताना अरिजीतला त्यामध्ये पुरस्कार मिळाल होता. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आलेला अरिजीत आणि सलमानमध्ये मजे-मजेत काही वाद झाला होता. मात्र अरिजीतचं हे वागणं सलमानला न पटल्याने तो त्याच्यावर चांगलाच नाराज झाल्याचे समजते. तेव्हापासून त्या दोघांमध्ये ३६चा आकडा आहे आणि आपल्या कोणत्याही चित्रपटात अरिजीतचं गाणं नसावे, अशी सूचना सलमानने केली असून हा प्रकार अरिजीतला फारच महागात पडल्याचे दिसत आहे. सलमानच्या आगामी सुलतान चित्रटपटातूनही अरजितचे गाणे काढून टाकण्यासंबधी सलमानने सांगितले असून त्या पार्श्वभूमीवरच अरिजीतने ही जाहीर माफी मागितल्याचे समजते. सलमान व अरिजीतमधील वाद कधीच समोर आला नव्हता, मात्र आता अरिजीतने जाहीररित्या सलमानची माफी मागितल्याने हे प्रकरण उघडकीस आलं आहे.