मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळें(Nagraj Manjule)च्या 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला रिलीज होणार आहे. या चित्रपटात नागराज मंजुळेसोबत अभिनेते सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील (Sayali Patil) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मात्र या भूमिकेपूर्वी सायलीची निवड 'सैराट' चित्रपटातील आर्चीसाठी झाली होती. रिंकू राजगुरूच्या ऐवजी चित्रपटात सायली आणि आकाश यांची जोडी दिसली असती. मात्र तसं घडलं नाही आणि 'सैराट' ब्लॉकबस्टर ठरला. 'सैराट' चित्रपटाने आकाश आणि रिंकू यांना रातोरात लोकप्रियता मिळवून दिली. आता तुला आर्चीची भूमिका नाकारल्याचे वाईट वाटते का?, असे विचारल्यावर सायलीने नाही म्हणत त्यामागचे कारणही सांगितले.
प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत सायली पाटील म्हणाली, 'मी पुण्यात आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होते आणि कॉलेजमध्ये ऑडिशन सुरू होत्या. मी सहज ऑडिशन दिली. मला कळतही नव्हते काय चालले. पास झाले. पण मला गांभीर्य नव्हते मी काय करतेय. नागराज मंजुळे सरांनी ठरवले मीच आर्ची होणार पण तेव्हा मी नाही म्हणाले. 'सैराट' रिलीज झाला आणि चित्रपटाला प्रचंड यश मिळाले, पण मी अभिनय करायचे ठरवले नव्हते. त्यामुळे मला तेव्हा असे मुळीच वाटले नाही की मी करायला हवा होता रोल. त्यानंतर काही वर्षांनंतर नागराज सरांचा फोन आला. मला तो प्रॅन्क कॉल वाटलेला.