सिनेइंडस्ट्रीत गेल्या काही वर्षांमध्ये बालकलाकारांचा वावर वाढलेला दिसतो आहे. अनेक कलाकारांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होतो आता तेच बालकलाकार लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. या बालकलाकारांच्या लिस्टमधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे मृणाल जाधव. पदार्पणातच मृणालने एका पेक्षा एक हिट चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.
मृणाल जाधव हिचे नाव घेताच समोर येतो तो दृश्यम चित्रपटातील ती निरागस चिमुरडी. इतक्या लहान वयात मृणालने केलेला अभिनय पाहून सर्वजण थक्क झाले होते. आता मृणाल मोठी झाली असून शेवटची ती भयभीत या मराठी चित्रपटात झळकली होती.
मृणालचे वडील मुंबई पोलीस खात्यात कार्यरत आहेत. तिला अभिनय क्षेत्रात येण्याचे प्रोत्साहनदेखील तिच्या वडिलांनी दिले आहे. मृणालने तिच्या कारकीर्दीची सुरूवात मराठी टेलिव्हिजनवरून केली होती. तिने २०१३ साली राधा ही बावरी या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने बऱ्याच हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे.
२०१४ साली ती रितेश देशमुखच्या लय भारी चित्रपटात झळकली होती. २०१५ साली दृश्यम चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका तिने केली होती. याशिवाय स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांच्या तु ही रे चित्रपटातील मृणालचे काम प्रेक्षकांना खूप भावले होते.
याशिवाय मृणालने ‘नागरीक’, ‘कोर्ट’, ‘टाईमपास २’, ‘अ पेईंग घोस्ट’ आणि ‘अंड्याचा फंडा’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘उंच माझा झोका’ या मालिकेतही काम केले आहे.