१९८६ साली 'माझं घर माझा संसार' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील 'दृष्ट लागण्या जोगे सारे' हे गाणे आजही अनेकांच्या ओठावर रुळताना दिसते. हे गाणे आठवलं की, डोळ्यासमोर येतात ती ट्रेनमधील ते जोडपे. या चित्रपटात अजिंक्य देवसोबत अभिनेत्री मुग्धा चिटणीस (Mugdha Chitnis) मुख्य भूमिकेत होती.
गायिका अनुराधा पौडवाल आणि गायक सुरेश वाडकरांनी गायलेली या चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या मनात घर करून कायम आहे. या चित्रपटात अजिंक्य देवच्या आईची भूमिका दिवगंत अभिनेत्री रीमा लागू यांनी केली होती. सासू आणि सुनेचे नाते साकारणाऱ्या या दोघींनी तेव्हाच्या परिस्थितीचा आढावा समोर मांडला होता. विशेष बाब म्हणजे मुग्धा चिटणीस या अभिनेत्री साकारलेला हा एकमेव चित्रपट आहे.
तुम्हाला वाचून धक्का बसेल, अभिनेत्री मुग्धा चिटणीसने वयाच्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ५ डिसेंबर १९९४ साली तिला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि १० एप्रिल १९९६ साली मुग्धा चिटणीसने अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुग्धा केवळ अभिनेत्रीच नव्हती तर ती उत्कृष्ट कथा-कथनकारही होती. भारत आणि अमेरिकेत तिने कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये पुष्कळ कार्यक्रम सादर केले. १८ फेब्रुवारी १९६५ साली तिचा जन्म झाला होता. मुग्धा चिटणीस उमेश घोडके यांच्याशी लग्न झाले होते. कॅन्सरने मृत्यू झाला तेव्हा मुलगी ईशा अवघ्या ५ वर्षाची होती.
मुग्धाच्या मृत्यूनंतर मुलगी ईशा आपले आजी आजोबा अशोक आणि शुभा चिटणीस यांच्यासोबत मुंबईत राहिली. उमेश घोडके यांनी ईशाला आई आणि वडील असे दोघांचे प्रेम दिले. शिक्षणासाठी त्यांनी तिला अमेरिकेत पाठवले. ईशाने अमेरिकेत कायदे विभागात प्रमुख पदावर काम केले आहे. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून जर्मन भाषा आणि पत्रकारितेची पदवी मिळवली आहे.