जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकन-भारतीय चित्रपटनिर्माते अनंत सिंह यांना महात्मा गांधी यांच्यावरील नवा माहितीपट (डॉक्युमेंटरी) त्याच्या नियोजित तारखेच्या आधीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे.
अमेरिकेत आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. त्यानंतर जगभर संताप व्यक्त होत असून, त्या पार्श्वभूमीवर गांधीजींच्या अहिंसा शिकवणुकीचे महत्त्व पटवून देण्याचा उद्देश या माहितीपटामागे आहे. या चित्रपटाचे नाव ‘अहिंसा-गांधी : द पॉवर आॅफ द पॉवरलेस’ असून, त्याचे लेखन आणि दिग्दर्शन रमेश शर्मा यांचे, तर निर्मिती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दक्षिण आफ्रिकन भारतीय चित्रपट निर्माते अनंत सिंह यांच्या व्हिडिओव्हिजन कंपनीची आहे. माहितीपटाचे निमित्त आहे महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे. आधी हा चित्रपट पहिल्यांदा जगातील चित्रपट महोत्सवांत दाखवला जाणार होता.या माहितीपटात जगातील इतिहासकार आणि विद्धान गांधीजींनी जगावर टाकलेल्या प्रभावावर भाष्य करतील. महात्मा गांधी यांनी दिलेली शांतता व अहिंसेची शिकवण जगाला पुन्हा सांगण्याची वेळ आलेली असताना हा चित्रपट येत आहे, असे अनंत सिंह म्हणाले.७ जूनला काम पूर्णया माहितीपटाचे काम ७ जून रोजी पूर्ण झाल्याचे सिंह म्हणाले. ७ जून, १८९३ रोजी गांधीजींना दक्षिण आफ्रिकेतील पीटरमॅरीटझबर्ग स्टेशनवर रेल्वेतून फेकून दिले गेले होते. कारण होते गांधीजी बसले होते तो डबा फक्त गोऱ्या लोकांसाठी राखीव होता. या अपमानामुळे गांधीजींनी या अशा भेदभावाविरोधात आयुष्यभर लढण्यास सुरुवात केली.