गेल्या काही महिन्यांमध्ये गौतमी पाटील (gautami patil) हे नाव अचानक प्रकाशझोतात आलं आहे. आपल्या डान्स स्टाइलमुळे गौतमी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे आज गौतमी हे नाव उभ्या महाराष्ट्राला माहित झालं आहे. गौतमी आणि तिच्या कार्यक्रमांमध्ये होणारे राडे, लावणी करतानाचे तिचे हावभाव यांवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांची मत मांडली आहेत. यामध्येच आता मराठीतील एका दिग्गज अभिनेत्याने तिला थेट काही प्रश्न विचारले आहेत. या अभिनेत्याच्या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेता राजन पाटील (rajan patil) यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी गौतमी आणि तिच्या चाहत्यांना काही प्रश्न विचारले आहेत. यात खासकरुन गौतमी इनकम टॅक्स भरते का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
काय आहे राजन पाटील यांची पोस्ट?
"नमस्कार मंडळी, या काही प्रश्नांची उत्तरे शोधा.
१. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होऊन पोलिसांचा लाठीमार का होतो? यापूर्वी रसिकांना अनेक लावणी सम्राज्ञीनी वेड लावले होते. पण असा प्रकार क्वचितच झाला असेल. मग आत्ताच का?
२. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाचे मूल्य काही लाखात असते?
३. जर हे सत्य असेल तर ती या सर्व उत्पन्नावर आयकर भरते का?
४. तिच्या उत्पन्नात कोणी सक्षम/सशक्त असामी वाटेकरी आहे का?
५. जर असेल तर तो अदृश्य असामी कुठल्या विशिष्ठ पक्षाचा आहे का? की ' तेलगी ' प्रकरणात होते म्हणे तसे सर्वपक्षीय सामील आहेत?
६. काही दबंग वाहिन्या ती अत्यंत भोळी आहे, निरागस आहे, निष्पाप असून तिची हकनाक बदनामी केली जातेय अशी इमेज तयार करतायत का?
७. 'गौतमीच्या कार्यक्रमात राडा ' यात काही काहीतरी गूढ आहे असं तुम्हाला वाटतं का?"
दरम्यान, राजन पाटील यांनी फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच ती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. आता राजन पाटील यांच्या या प्रश्नांची उत्तर गौतमी देणार का? याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.