ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - 'कुत्ता रोड पे सोएगा तो कुत्ते की मौत मरेगा, रोड्स गरीब के बाप की नही है' असे वादग्रस्त वक्तव्य गायक अभिजीत भट्टाचार्यने केल्याने नवा वाद उफाळला आहे. हिट अँड रन प्रकरणी न्यायालयाने अभिनेता सलमान खानला दोषी ठरवून त्याला ५ वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर बॉलिवूडमद्ये तीव्र नाराज पसरली असून अनेकांनी या निर्णयाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर अभिजितने ट्विटरवरून ही मुक्ताफळे उधळली आहेत.
'रस्ते हे गाड्या व कुत्र्यांसाठी असतातस, लोकांनी झोपण्यासाठी नव्हे. सलमान खानची कोणतीही चूक नाही' असे ट्विट त्याने केले आहे. 'मीही वर्षभर बेघर होतो, म्हणून मी रस्त्यावर झोपलो नाही. फूटपाथवर झोपायची फार हौस असेल कर लोकांनी गावी जावे, तेथे कोणतीही गाडी अंगावर येणार नाही', असा खोचक सल्लाही त्याने दिला आहे. 'सर्वांनी सलमानच्या पाठिशी उभं रहायला हवं. रस्ते व फूटपाथ हे झोपण्यासाठी नसतात. त्यामुळे त्यात ड्रायव्हरचा कोणताही दोष असू शकत नाही' असे तारेही त्याने तोडले आहेत.