बिग बॉस १८ (Bigg Boss 18) ला दोन दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. एकूण १८ सदस्यांनी घरात प्रवेश केला आहे. सोबतच एक गाढव सुद्धा बिग बॉसच्या घरात गेले आहे. 'गधराज' हे गाढव १९ वा सदस्य बनून घरात गेले. मात्र यामुळे आता सलमान खान आणि बिग बॉस अडचणीत सापडले आहेत. प्राण्यांसाठी काम करणारी संस्था PETA (People for The Ethical Treatment of Animals) ने बिग बॉसला पत्र लिहिले आहे.
बिग बॉसमध्ये गाढवाची एन्ट्री झाल्याने अनेक प्रतिक्रिया आल्या. याला २४ तास बांधलेलं पाहायला मिळत आहे. 'पेटा'ने यावर नाराजी दर्शवत शोच्या मेकर्सला पत्र लिहिले आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, "बिग बॉसच्या घरात गाढवाला ठेवण्यात आल्याने बऱ्याच लोकांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारी योग्य आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष होऊ नये. सेटवर अशा प्रकारे एखाद्या प्राण्याला ठेवणं ही मजेशीर बाब नाही. मनोरंजनासाठी प्राण्यांचा वापर करु नका." यासोबत त्यांनी पत्रात सलमानला विनंती केली की होस्ट आणि स्टार कलाकार या नात्याने त्याने गाढवाला पुन्हा मेकर्सकडे सोपवलं पाहिजे. जेणेकरुन त्याला इतर सुटका केलेल्या गाढवांसोबत पाठवण्यात येईल.
काही मीडिया रिपोर्टनुसार, हे गाढव अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचे आहे. पेटा ही संस्था प्राण्यांची एनजीओ म्हणून काम करते.प्राण्यांवर होणारे अत्याचार थांबवते. तसंच त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करते. बिग बॉस शोमध्ये 'गधराज' ला पाहून अनेक प्राणी प्रेमींनी चिंता व्यक्त केली. यामुळ पेटाने लगेचच पावलं उचलली.