'शिवपुत्र संभाजी' (shivputra sambhaji) या महानाट्याचा प्रयोग सुरु असताना डॉ. अमोल कोल्हे (dr Amol Kolhe) यांना गंभीर दुखापत झाली आहे. नाटकाच्या सेटवर त्यांच्यासोबत एक दुर्घटना घडली असून त्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. परिणामी, या महानाट्याचे काही प्रयोग रद्द करण्यात आले आहे. अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत याविषयीची माहिती दिली.
डॉ. अमोल कोल्हे यांचं शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. मात्र, रविवारी रात्री प्रयोग सुरु असतानाच त्यांची घोड्यावरुन एन्ट्री होत असताना त्यांचा अपघात झाला. महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा कराडमध्ये प्रयोग होणार होता. तसंच त्याच्यानंतर त्यांचे अन्य दोन प्रयोग होते. मात्र ते दोन प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.
कसा झाला डॉ. अमोल कोल्हे यांचा अपघात
या महानाट्यामध्ये अमोल कोल्हे यांची घोड्यावरुन एन्ट्री दाखवण्यात आली आहे. त्यामुळे घोड्यावरुन एन्ट्री करत असताना त्यांच्या घोड्याचा मागचा पाय अचानकपणे दुमडला. ज्यामुळे पाठीला जर्क बसून अमोल कोल्हे यांना दुखापत झाली आहे. विशेष पाठीला दुखापत झालेली असतानादेखील त्यांनी हा प्रयोग पूर्ण केला. परंतु, त्यांना पुढील प्रयोग करता येणार नाहीयेत.
दरम्यान, शिवपुत्र संभाजी हे नाटक फार कमी वेळात लोकप्रिय झालं आहे. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. १ मे चा म्हणजेच आजचा प्रयोग संपल्यानंतर अमोल कोल्हे मुंबईत परतणार असून उपचार घेणार आहेत. त्यानंतर ११ मे पासून ते पुन्हा या नाटकाचे प्रयोग सुरु करतील, असं सांगण्यात येत आहे.