छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची सर्वांगसुंदर भूमिका साकारत डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe ) यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवलं. उत्कृष्ट वक्ता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा खासदार अशीही त्यांची ओळख आहे. अभिनय आणि राजकारण यांची योग्य सांगड घालत अमोल कोल्हे यांचा प्रवास सुरू आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आदर आहे. शिवाय त्यांच्या उत्कृष्ट वकृत्व शैलीचेही लोक फॅन आहेत. साहजिकच गेल्या काही काळात ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत, अमोल कोल्हे यांनी मोदी लाट असतानाही लोकसभेची निवडणूक जिंकली. 2019 मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 4 खासदार निवडून आले. यामध्ये अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. तेव्हापासून राजकारण सुरू आहे. सोबत मनोरंजनही. पण यात कुठेतरी मन, शरीर थकणारचं. अशात त्यांची एक पोस्ट चर्चेत आहे. होय, थकवा आलाय... एकांतवासात जातोय..., अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
पोस्टमध्ये ते लिहितात,
सिंहावलोकनाची वेळगेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन!घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा करणार आहे. त्यासाठीच आपण एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू... नव्या जोमाने, नव्या जोशाने!! चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, अशी तळटीप सुद्धा त्यांनी लिहिली आहे.