Shivpratap Garudzep Teaser : ऐतिहासिक मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आता आणखी एक असाच शिवरायांची महती सांगणारा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाचं नाव आहे, ‘शिवप्रताप- गरुडझेप’ (Shivpratap Garudzep). डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. नुकतेच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. हा टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शिवाजी महाराजांच्या आग्य्राहून सुटकेचा प्रसंग या चित्रपटातून जिवंत करण्यात येणार आहे. आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून छत्रपती आग्य्राहून निसटले. हाच थरार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
अमोल कोल्हे यांनी या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. ‘मराठी स्वाभिमानाचा अंगार... काल, आज आणि उद्याही... शिवप्रताप गरूडझेप...2022’ असं त्यांनी हा टीझर शेअर करताना लिहिलं आहे.
चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका अमोल कोल्हे जिवंत करणार आहे. त्यांचीच निर्मिती असलेला हा सिनेमा कार्तिक राजाराम यांनी दिग्दर्शित केला आहे. तूर्तास ‘शिवप्रताप- गरूडझेप’चा टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. आत्तापर्यंत लाखांवर लोकांनी हा टीझर पाहिला आहे. ग्रेट, तुम्ही तुम्ही आणि फक्त तुम्हीच, अशी कमेंट टीझर पाहून एका चाहत्याने केली आहे. प्रचंड उत्सुकता, आतुरता... खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा, अशा शब्दांत एका चाहत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘राज्यरक्षक संभाजी; या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे हे घराघरात पोहोचले. तसेच शिवाजी महाराजांच्या भूमिकेतही डॉ. कोल्हे यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे.