Jhund Trailer: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘झुंड’ (Jhund ) या चित्रपटाचा ट्रेलर कालच प्रदर्शित झाला. नागराज मंजुळे दिग्दर्शित (Nagraj Manjule) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. काल ट्रेलर रिलीज झाला म्हटल्यावर, चाहते जणू ‘सैराट’ झालेत. ट्विटरवर या ट्रेलरची आणखी एका विशेष कारणाने चर्चा रंगली. होय, ट्रेलरमधील एक फ्रेम पाहून नेटकरी नागराज मंजुळेंच्या जणू प्रेमात पडले.
होय,‘झुंड’च्या ट्रेलरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांना एकाच फ्रेममध्ये दाखवले आहे. त्यांच्यासोबतच महानायक अमिताभ बच्चन यांनाही दाखवण्यात आलं आहे.
ट्रेलरमधील या दृश्याचीच चर्चा रंगली. ‘ये बॉलिवूड में नया बदलाव है...,’ म्हणत नेटकऱ्यांनी नागराज यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हिंदी सिनेमात पहिल्यांदाच, मेनस्ट्रीम सिनेमात क्रांती फक्त नागराज मंजुळेच करू शकतो, बेस्ट ऑफ लक अण्णा, अशा शब्दांत अनेकांनी या नागराज यांचं कौतुक केलं.
चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं आहे. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. ‘झुंड’च्या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 'झुंड' हा चित्रपट 4 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त रिंकू राजगुरु (Rinku Rajguru), आकाश ठोसर (Akash Thosar) आणि किशोर कदम (Kishor Kadam) मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
कसा आहे ट्रेलर?
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांमध्ये फुटबॉलचं प्रेम जागृत करुन त्यांना कसं सरळ मार्गावर आणतात हे थोडक्यात दाखवण्यात आलं आहे. या ट्रेलरमध्ये सुरुवातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
गरीबी, अवहेलना यामुळे वाईट मार्गाला लागलेली, नशेच्या आहारी गेलेल्या मुलांमध्ये विजय ( अमिताभ बच्चन) यांना खिलाडू वृत्ती दिसते. त्यामुळे या मुलांना नीट ट्रेनिंग मिळालं. तर ते राष्ट्रीय स्तरावर नक्कीच चांगली कामगिरी करतील अशी त्यांना आशा असते. त्यामुळे विजय या मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात करतात. मात्र, केवळ झोपडपट्टीत राहतात किंवा चांगल्या शाळा-कॉलेजमध्ये ते न शिकल्यामुळे अनेकदा त्यांना काही जण फुटबॉल खेळण्यापासून रोखतात. मात्र, विजय हार न मानता त्यांना ट्रेनिंग देतात. विशेष म्हणजे ही मुलंदेखील विजय यांच्या कष्टाचं चीज करतात. असं एकंदरीत या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.