- Satish Dongare
बॉलिवूडमध्ये काही भूमिका अशा साकारल्या जातात, ज्या प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी अधिराज्य करतात. मग तो खलनायक साकारणारा अभिनेता असो वा ‘आई’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री असो. हे कलाकार अशा प्रकारचे पात्र असे काही रंगवितात की, लोक त्यांना त्याच भूमिकेत बघणे पसंत करतात. ‘आई’ची भूमिका साकारताना बॉलिवूडमध्ये अशाच काही अभिनेत्री प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रेक्षकांनी जेव्हा-केव्हा त्यांना पडद्यावर बघितले, तेव्हा त्या आईच्याच भूमिकेत बघावयास मिळाल्या. आज आम्ही अशाच काही फिल्मी आईच्या भूमिकांविषयी तुम्हाला सांगणार आहोत...!राखी‘मेरे करण अर्जुन आएंगे’ हे शब्द जरी कानांवर पडले, तरी अभिनेत्री राखी यांचा चेहरा समोर येतो. ‘करण-अर्जुन’प्रमाणे अनेक चित्रपटांमध्ये आईचे पात्र साकारून त्यास जिवंत करणाऱ्या राखी यांना बॉलिवूडमध्ये याच भूमिकेने खऱ्या अर्थाने ओळख निर्माण करून दिली. विशिष्ट शैलीतील त्यांचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. वहिदा रेहमानबॉलिवूडमधील आणखी एक ‘आई’ म्हणजे अभिनेत्री वहिदा रेहमान या होत. आपल्या मुलांच्या समर्थनार्थ प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी या आईचा लढा चित्रपटांमध्ये आपण बघत आलो आहोत. वहिदा या आईच्या भूमिकेसाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. रिमा ९० च्या दशकातील राजश्री प्रॉडक्शनची फेमस ‘आई’ रिमा आजही या प्रकारच्या भूमिका साकारत आहेत. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातील त्यांची गोड स्माइल आजही अनेकांना आठवते. या भूमिकेचा त्यांना फायदा अन् तोटाही झाल्याचे त्यांनी एकदा म्हटले होते. फरिदा जलालअभिनेत्री फरिदा जलाल यांना आजही बॉलिवूडमध्ये ‘सिमरन की माँ’ म्हणून ओळखले जाते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी इतरही बऱ्याचशा चित्रपटांमध्ये ‘आई’चे दमदार पात्र साकारले आहे. अजूनही त्या अशा प्रकारच्या भूमिका साकारत आहेत. निरुपा रॉयदिवारमधील ‘मेरे पास मां है’ या डायलॉगमुळे आजही निरुपा रॉय या प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. चित्रपटसृष्टीतील या आईने अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे. आपल्या मुलांसाठी कुठल्याही प्रकारचे बलिदान देणारी ही आई प्रेक्षकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील यात शंका नाही. जया बच्चन‘कभी खुशी-कभी गम’ या चित्रपटात अभिनेत्री जया बच्चन यांनी ‘आई’चे पात्र साकारून आपण या भूमिकेसाठी किती परिपक्व आहोत, हेच दाखवून दिले आहे. यात जया आपल्या मुलांच्या आनंदासाठी त्यांच्या प्रत्येक सुख-दु:खात सहभागी होताना बघावयास मिळाल्या.