सस्पेन्स, थ्रिलर सिनेमा म्हटलं की 'दृश्यम' चं नाव येतंच. मूल मल्याळम सिनेमात सुपरस्टार मोहनलाल यांनी भूमिका साकारली. तर हिंदी सिनेमात अजय देवगणने सर्वांना खिळवून ठेवलं. दोन्ही भाषेत सिनेमाचा सीक्वेलही आला. आता सर्वांनाच तिसऱ्या भागाची आतुरता आहे. काही दिवसांपूर्वीच तिसरा भाग दोन्ही भाषेत एकाचवेळी शूट होणार असल्याची चर्चा होती. तर आता स्वत: मोहनलाल (Mohanlal) यांनीच 'दृश्यम ३' बाबत ट्वीट करत शिक्कामोर्तब केलं आहे.
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी आज ट्वीट केलं आहे. ते लिहितात, "भूतकाळ कधीच शांत बसत नाही. दृश्यम ३ कन्फर्म!" यासोबत त्यांनी फोटोही शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत दिग्दर्शक जीतू जोसेफ आणि एंटनी पेरुम्बावूर दिसत आहेत. तिघांनी मिळून सिनेमाच्या तिसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केली आहे.
दृश्यम सिनेमा मूळ मल्याळम असला तरी नंतर तो अनेक भाषांमध्ये डब झाला. जगभरात या सिनेमाला प्रतिसाद मिळाला. अजय देवगणनेही हिंदीत अप्रतिम काम केलं. तर तब्बूने सिनेमात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. तर दुसऱ्या भागात अक्षय खन्ना पोलिस होता. दोन्ही सिनेमे बॉक्सऑफिसवर तुफान चालले. आता अजय देवगणही तिसऱ्या भागाची घोषणा कधी करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.