स्वप्नांची नगरी... मायानगरी... मुंबई.... या दुनियेत स्वतःचं नाव आणि पैसा कमावण्याचं स्वप्न ऊराशी बाळगून अनेकजण मुंबईत येतात. मात्र इथं स्वतःची ओळख बनवणं तितकंच सोपं नसते. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आणि ध्येयपूर्तीसाठी अनेक खडतर मार्ग त्यांना पार करावे लागतात. यातूनच कास्टिंग काऊच, बडे निर्माते-दिग्दर्शक किंवा दिग्गज कलाकारांकडून होणाऱ्या छळाचा सामना करत तडजोड करावी लागते. हिंदी चित्रपटटसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून #MeToo ही मोहिम जोरात सुरू आहे. या अंतर्गत अनेक अभिनेत्री आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. तनुश्री दत्ता, कंगणा राणौत, काल्की कोचलिन, रिचा चढ्ढा, सोनम कपूर, सुचित्रा कृष्णमूर्ती, विनता नंदा, केट शर्मा अशा कित्येकजणींनी आपल्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना वाचा फोडली आहे. यांत आणखी एका अभिनेत्रीचे नाव घ्यावं लागेल. ही अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर.
'वीरे दी वेडिंग' फेम या अभिनेत्रीनंही आपलं मौन सोडलं आहे. करियरच्या सुरूवातीला अनेक दिग्दर्शकांनी त्रास दिल्याचा आरोप तिने केला आहे. काम देण्याच्या बहाण्याने बऱ्याच पुरूषांनी विविध मागण्या केल्या. मात्र त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी आपल्या मेसेजेसना उत्तर देणं बंद केल्याचं तिने सांगितलं. त्यांना हवी असणारी गोष्ट मी देऊ शकणार नसल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांचे मेसेज बंद झाले असं स्वराने सांगितले. मात्र या सगळ्या गोष्टीमुळे असुरक्षितेची भावना निर्माण झाल्याचेही तिने नमूद केले आहे. एकदा 56 दिवसांच्या शूटिंगसाठी आऊटडोअर असताना काय घडलं याचा किस्साही तिने शेअर केला आहे.
त्या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान संबंधित दिग्दर्शिक कायम आपल्या मागावर असायचा आणि रात्र झाली की फोन करण्यास सुरूवात करायचा असं तिने म्हटले आहे. अनेकदा सिनेमाच्या कथेसंदर्भात तो हॉटेलच्या रूमवर बोलवायचा आणि आपल्यासमोरच हातात दारूचा ग्लास घेऊन बसायचा. एकदा तर मद्यधुंद अवस्थेत आपल्या खोलीत तो शिरला आणि मिठी मारण्यास सांगितलं अशी आठवण स्वराने शेअर केली. या सगळ्या घटनेमुळे भेदरल्याचे स्वराने नमूद केले आहे. या प्रसंगानंतर पॅकअप झाल्यावर रूमवर लाईट्स बंद करून बसायचे ज्यामुळे त्या दिग्दर्शकाला आपण झोपलो आहोत असं वाटेल असंही स्वराने सांगितले आहे.